कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाने ध्वनीप्रदूषण मुक्त, डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन कल्याण, डोंबिवली परिसरातील गणेशभक्तांना केले आहे. असे असताना काही गणेशभक्त प्रशासनाच्या आदेशाचा विचार न करता गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेसह, कर्णकर्कश कानठळ्या बसविणाऱ्या दोन सिलिंडर आकाराच्या लोखंडी टाक्यांचा वादनासाठी वापर करत आहेत. हातोडीने ठोकून वाजविण्यात येणाऱ्या सिलिंडर टाक्या वादनात कोणताही नाद नसताना ते वाजविण्यात येत असल्याने गणेशभक्त, बंदोबस्तावरील पोलीस, वाहतूक पोलीस अस्वस्थ आहेत.

मागील अनेक वर्षापासून पुणे, नाशिक, मालेगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहिल्यानगर भागातून कल्याण, डोंबिवली शहर परिसरात गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यासाठी ढोल पथके येतात. पारंपारिक वाद्य प्रकार या वाद्यवृंदाकडून वाजविली जातात. गणपती आगमनापासून ते अनंत चतुर्थी असा अकरा दिवस त्यांचा कल्याण, डोंंबिवली परिसरातील निवारे, पदपथ, आडोशांमध्ये मुक्काम असतो. पैसे कमविण्याचा हा हंगाम असल्याने ते आहे त्या परिस्थितीवर मात करत गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होतात.

अलीकडे काही वाद्यवृंद चालक आपल्या वाद्यवृंदात सिलिंडर टाकी सारख्या दोन लोखंडी टाक्या लोटगाडीवर टांगून त्या ढोल ताशांच्या गजरातील ठेक्यावर हातोडीने ठोकून वाजविल्या जात आहेत. कानठळ्या बसविणारा, कर्णकर्कश असा आवाज या लोखंडी सिलिंडर टाक्यांमधून बाहेर पडत असल्याने वादनाच्या ठिकाणी उभे असलेल्या नागरिकांना आपला कानाचा पडदा आता फाटतो की काय असा भास होतो, अशा तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या.

ढोल, ताशा, लेझिम, झांजा यांच्या वादनातून एक नाद बाहेर पडत असतो. त्या ठेक्यावर भाविक ठेका धरतात. पण, सिलिंडरची लोखंडी टाकी हातोडीने ठोकून त्यामधून कोणता लय, नाद बाहेर पडणार. अशी वाद्ये आपण वाजून आपल्या पारंपारिक वाद्यांना आव्हान देत आहोत, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून दिल्या जात आहेत. डीजेच्या हदयाचे ठोके चुकविणाऱ्या वादनाने एकीकडे नागरिक हैराण आहेत. त्यात आता हा सिलिंडर टाकी हातोडीने वाजविण्याच्या नव्या प्रकाराने नागरिक अस्वस्थ आहेत.

हे वाद्यवृंद जेव्हा रुग्णालये, बालकांची रुग्णालये, वृध्द काळजी वाहक केंद्राजवळून जात असतात. तेव्हा रुग्णालय, काळजी वाहक केंद्रातील रूग्ण, घरात उपचार घेत असलेले रुग्ण अस्वस्थ होतात, अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. महापालिका, पोलीस प्रशासनाने पुढाकार घेऊन आरोग्यावर घातक परिणाम करणारी अनावश्यक वाद्ये वाद्यवृंदात वाजविली जाणार नाहीत यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.