कल्याण – कल्याण पूर्वेतील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा काढला होता. मोर्चाचे शिष्टमंडळ नीलेश शिंदे यांच्या पुढाकाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी चर्चा करत असताना तेथे कल्याण पूर्वचे अपक्ष आमदार गणपत गायकवाड समर्थकांसह पोहचले. यावेळी गणपत गायकवाड समर्थक आणि नीलेश शिंदे यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन पोलीस ठाण्यात दोन्ही गटात हमरीतुमरी झाली होती.
पोलीस ठाण्यात दालनामध्ये आमदार गायकवाड आणि शिंदे यांच्यासह समर्थकांनी राडा केल्याप्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड, नीलेश शिंदे, गायकवाड समर्थक कुणाल पाटील, विक्की गणात्रा अशा एकूण पाच जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. आता नीलेश शिंदे हे शिंंदे शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करून कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. अकरा वर्ष हा खटला न्यायालयात सुरू होता. अखेर याप्रकरणात न्यायालयाने गणपत गायकवाड, नीलेश शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थकांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.
हिललाईन पोलीस ठाण्यात माजी नगरेसवक महेश गायकवाड यांच्यावर दोन वर्षापूर्वी गोळीबार केल्याप्रकरणी गणपत गायकवाड हे तळोजा कारागृहात आहेत. गायकवाड हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी निर्दोष सुटले आहेत. त्यांचा हिललाईन पोलीस ठाण्यातील घटनेप्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू आहे.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी, कल्याण पूर्वेत गुन्हेगारी, चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या वाढत्या गुन्हे, चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे तत्कालीन माजी नगरसेवक नीलेश शिंदे यांनी नागरिकांचा विराट मोर्चा २०१४ मध्ये कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर काढला होता. या कालावधीत कल्याण पूर्वचे आमदार म्हणून गणपत गायकवाड अपक्ष म्हणून निवडून आले होते. या निवडणुकीत नीलेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गायकवाड यांच्या विरूध्द निवडणूक लढवली होती. त्यामुळे गायकवाड आणि शिंदे यांच्यात कुरबुऱ्या होत्या. आपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीने मोर्चा काढल्याने आमदार गणपत गायकवाड यांना खटकले होते.
नीलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे शिष्टमंडळ कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांशी चर्चा करत होते. त्यावेळी दालनात अचानक आमदार गणपत गायकवाड आपल्या समर्थकांसह आले. चर्चेत तेही सहभागी झाले. यावेळी आमदार गायकवाड आणि राष्ट्रवादीचे नीलेश शिंदे यांच्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यात दालनात राडा झाला. पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्या प्रकरणी पोलिसांनी आमदार गायकवाड, नीलेश शिंदे आणि समर्थकांवर गुन्हे दाखल केले होते.
याप्रकरणाच्या वेळोवेळी सुनावण्या झाल्या. याप्रकरणात तपासात अनेक त्रृटी आढळल्या आणि सबळ पुरावे तपास यंत्रणा सादर करू शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणातील आमदार गणपत गायकवाड, नीलेश शिंदे यांच्यासह एकूण पाच जणांची निर्दोष मुक्तता केली.
आता नीलेश शिंंदे शिंदे शिवसेनेत आहेत. माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्व भागातून महायुतीमधून विजयी करण्यासाठी वर्षभरापूर्वी शहरप्रमुख नीलेश शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केले होते.