ठाणे : ठाण्यातील घोडबंदर भागात वाहतुक कोंडी आणि खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी सकाळी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. मागण्या मान्य झाल्या नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन करु. घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
घोडबंदर हा मार्ग उरण जेएनपीए बंदरातून वाहतुक करणाऱ्या आणि गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांसाठी महत्त्वाचा आहे. तसेच मिरा भाईंदर, वसई, विरार, पालघर भागातून ठाणे, नवी मुंबईत कामानिमित्ताने वाहतुक करणाऱ्या नोकरदारांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. घोडबंदर घाट रस्त्यावरुन अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतुक मोठ्याप्रमाणात होत असते. घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरु असलेली वाहतुक याचा परिणाम वाहतुक व्यवस्थेवर होतो.
दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मिरा भाईंदरच्या दिशेने वाहतुक करताना आणि तेथून या ठाणे, नवी मुंबईत जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसत असतो. या वाहतुक कोंडीत अवजड वाहने देखील अडकत असतात. त्यामुळे कोंडीत भर पडत आहे. सकाळी हजारो नोकरदारांकडून या मार्गाचा वापर होतो. वाहतुक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही.
तर चक्काजाम करु
वाहतुक कोंडीविषयी अनेक तक्रारी करुनही प्रशासनाकडून येथील कोंडी आणि खड्ड्यांची समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे संतापलेल्या रहिवाशांनी आज, शुक्रवारी सकाळी आंदोलनाचा निर्णय घेतला. येथील नोकरदार, रहिवाशांनी एकत्र येऊन ‘जस्टीस फाॅर घोडबंदर रोड’ ही संस्था सुरु केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. घोडबंदर येथील आनंद नगर चौकात वाहतुक पोलिसांची पोलीस चौकी आहे. या चौकीजवळील पदपथावर एकत्र उभे राहून फलक हातात घेऊन हे आंदोलन केले.
आम्ही रविवारी सर्व नागरिक रस्त्यावर उतरणार होतो. परंतु प्रशासनाकडे आता शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन त्यांच्याकडे मागण्या केल्या आहेत. परंतु त्यानंतरही काही परिणाम दिसला नाही तर भविष्यात लाखो लोक रस्त्यावर उतरुन चक्काजाम आंदोलन करु. घोडबंदर भागातील नागरिक देखील त्यासाठी तयार आहेत. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. आम्ही सर्व नोकरदार सुट्टी घेऊन हे आंदोलन करु असेही त्यांनी सांगितले.