कल्याण : आपण आरोपीच्या पिंजऱ्यात आहोत. आपण अटक आहोत, याची जाणीव असुनही कल्याण पूर्वेतील श्री बाल चिकित्सा रुग्णालयातील एका मराठी तरूणीला बेदम मारहाण करणाऱ्या गोकुळ झाची अरेरावी कमी होताना दिसत नाही. दोन दिवसापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात असताना गोकुळ झाने याने तुम्ही जे करताय ते चुकीचे करताय, तुम्हाला नंतर बघतो, असे पत्रकारांना म्हणाला. तर, पोलिसांनी गोकुळला चेहरा लपविण्यासाठी काळा बुरखा घालण्याचा प्रयत्न केला तर त्याने पोलिसांना बुरखा घालण्यास विरोध दर्शवून शेवटपर्यंत बुरखा परिधान करून दिला नाही.
पोलीस आणि पत्रकारांसमोर गोकुळ झाने अरेरावी करून आपल्यातील उर्मटपणा पुन्हा जाहीर केला. पोलीस समंजसपणे सांगत असताना गोकुळने बुरखा घालण्यास विरोध केल्याने पोलिसांनी त्याच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणला म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यात गुुन्हा दाखल केला आहे. गोकुळ विरुध्द कोळसेवाडी, मानपाडा आणि विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात असे एकूण आता चार गु्न्हे दाखल झाले आहेत. गोकुळ सोबत त्याचा भाऊ रंजित झा यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा या प्रकरणात काहीही सहभाग नाही. तरीही त्याला का अटक केले आहे, असा प्रश्न गोकुळ सतत पोलिसांना उद्देशून करत आहे.
मराठी तरुणीला मारहाण केल्यानंतर गोकुळ पळून गेला होता. वेशांतर करून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नेवाळी परिसरात त्याला स्थानिक रहिवासी आणि मनसेच्या कार्यकत्यांनी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. गोकुळचे वकील ॲड. हरिश नायर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहे.
आडिवली ढोकळी परिसराचा भाई म्हणून गोकुळ झाचा वावर होता, असे स्थानिक रहिवासी सांगतात. या भागात त्याची दहशत होती. रात्रीच्या वेळेत तो गटाने फिरून नागरिक, प्रवाशांना दमदाटी करायचा. आडिवली ढोकळी भागात रात्रीच्या वेळेत त्याने एका इमारतीच्या रखवालदाराला मारहाण केली होती. या रखवालदाराला गोकुळने या भागाचा भाई कोण असा प्रश्न केला होता. त्यावेळी रखवालदाराने आपणास माहिती नाही असे उत्तर गोकुळला दिले होते.
त्याचा राग येऊन गोकुळने मी या विभागाचा भाई असुन तुला माझे नाव माहिती नाही. तु मला ओळखत नाहीस, असे प्रश्न करत रखवालदाराला मारहाण करत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. या प्रकरणी रखवालदाराने तीन महिन्यापूर्वी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी गोकुळचा ताबा घेतला आहे.