कल्याण : दिवाळी सुट्टीचा हंगाम सुरू झाला आहे. या कालावधीत राज्याच्या विविध भागात जाण्यासाठी प्रवासी कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बस आगारात येत आहेत. याठिकाणी प्रवाशांची बसमध्ये चढ उतार करण्यासाठी गर्दी होत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत भुरटे चोरटे महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील, हातामधील सोन्याचा ऐवज लुटत आहेत.
दरवर्षी मे महिन्याची सुट्टी, दिवाळीची, होळी, गणेशोत्सव काळात भुरट्या चोरट्यांचा कल्याण, विठ्ठलवाडी बस आगार भागात सुळसुळाट असतो. बस आगारात सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षकांचा अभाव असल्याने भुरटे बस आगारात प्रवासी म्हणून येऊन मग या चोऱ्या करत आहेत. बसमध्ये चढ उतार करताना महिला प्रवाशांच्या गळ्यातील, हातामधील सोन्याचा ऐवज काढून घेतला की मग पु्न्हा बसमधून उतरून चोरटे पळून जात आहेत. मागील अनेक वर्षांचा चोरट्यांचा हा शिरस्ता आहे.
संध्याकाळी साडे सहा नंतर अंधार पडत असतो. या कालावधीत चोरी केल्यावर पळून जाणे सोयीस्कर असल्याने भुरटे संध्याकाळच्या वेळेत या चोऱ्या करत आहेत. पोलिसांनी संध्याकाळच्या वेळेत एस. टी. बस आगारात भागात गस्त घालण्याची प्रवाशांची मागणी आहे.
गेल्या आठवड्यात कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागात राधानगर परिसरात राहणाऱ्या विद्या उमेश झुंझारराव संध्याकाळच्या वेळेत कल्याण रेल्वे स्थानक भागात खरेदीसाठी आल्या होत्या. त्या बस आगारातून गांधारे येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. त्यांच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्या होत्या. बस आगारातील भुरट्या चोरट्याच्या या बांगड्या निदर्शनात आल्या.
त्याने विद्या झु्ंझारराव(५४) ज्या बसमध्ये चढत होत्या. त्या बसमध्ये त्यांच्या पाठोपाठ चढून त्यांच्या हातामधील सोन्याची बांगडी मोठ्या चलाखीने काढून घेतली. बसमध्ये चढल्यानंतर विद्या यांना आपल्या हातामधील सोन्याची बांगडी गायब असल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ बसमधून उतरून आजुबाजुला बांगडी कोठे पडल्याचे तपासले. कोठेही बांगडी आढळली नाही. त्यामुळे चोरट्याने बस मध्ये चढताना ती चोरून नेल्याचा संशय व्यक्त करून विद्या यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार कांगरे तपास करत आहेत.
दोन दिवसापूर्वी डोंबिवली पूर्वेतील आजदेगाव येथे वेताळ मंदिर भागात राहणाऱ्या वंदना जयराम पाटील (५५) कल्याण येथे एस. टी. बस आगारात आल्या होत्या. त्या बसमधून मोहना काॅलनी येथे जाणार होत्या. मोहना काॅलनी बसमध्ये चढत असताना गर्दी होती. वंदना पाटील यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या. बसमध्ये चढल्यानंतर वंदना यांना हातामधील बांगडी गायब असल्याचे दिसले. त्यांनी बसमध्ये आणि बस परिसरात पाहिले. बांगडी आढळली नाही. चोरट्याने ही बांगडी चोरून नेली होती. ऐशी हजार रूपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी चोरीला गेल्याने वंदना पाटील यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हवालदार सूर्यवंशी याप्रकरणाचा तपास करत आहेत.
कल्याण पश्चिम एस. टी. बस आगार भागात भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.