लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यार्ड पुर्नरचनेच्या (रिमॅाडेलिंग) काम सुरू असल्याने शुक्रवारी सकाळपासून हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गाची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. तर ठाणे स्थानकातून सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांनी सुटणारी पनवेल रेल्वेगाडी रद्द करण्यात आली. त्यामुळे शुक्रवारी प्रवाशांचे हाल झाले. अनेकांना वेळेत कामावर पोहचता आले नाही.
नवी मुंबई शहरात अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे ठाणे, कर्जत, कसारा, खोपोली आणि मुंबई उपनगरातील हजारो नोकरदार हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरून नवी मुंबईत येत असतात. गेल्या काही दिवसांपासून येथील पनवेल रेल्वे स्थानकाजवळ यार्ड पुर्नरचनेचे काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पनवेल रेल्वे स्थानक परिसरात लोकलचा वेग ८० वरून ताशी ३० किमी इतका केला आहे. त्यामुळे पनवेल स्थानकाजवळ रेल्वे गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. याचा परिणाम ट्रान्स हार्बर आणि हार्बर रेल्वे वाहतुकीवर झाला. येथील वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
तर ठाणे – पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील सकाळी ८ वाजून ४१ मिनिटांची ठाणे पनवेल लोकल रद्द करण्यात आली. ऐन गर्दीच्या वेळेत लोकल रद्द केल्याने प्रवाशांचे हाल झाले. ठाणे, एरोली, घणसोली स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली आहे. पनवेल येथे काही प्रवासी रुळांवरून चालत जात असल्याचे चित्र आहे.