ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संपुर्ण शहरात राबविण्यात येत असलेल्या ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानामध्ये गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या आरोग्य पथकाने सात हजार महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ९८७ महिलांची टेंभीनाक्यावरील देवीच्या मंडपाजवळ आयोजित शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या सर्वच महिलांना ‘देवीचा प्रसाद’ म्हणून फोलीक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न अशी दहा दिवसांची औषधे देण्यात आली आहेत. या तपासणीत वयोगटाच्या तुलनेत कमी वजन असलेल्या एकूण १४१ महिला आढळून आल्या आहेत. १०२ महिलांचे एक्सरे काढण्यात आले असून त्यापैकी दहा महिलांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हाॅर्ट केअर केंद्रात पाठविण्यात आले आहे. काही महिलांचे तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसून त्याचबरोबर मॅमोग्राफीचे अहवालही प्राप्त झालेले नाहीत, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

नवरात्रौत्सवाच्या काळात म्हणजेच २६ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वत्र ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फतही हे अभियान संपुर्ण शहरात राबविण्यात येत आहे. ठाणे महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि टेंभीनाक्यावरील नवरात्रौत्सवाच्या ठिकाणी हे अभियान राबविण्यात येत असून त्यामध्ये १८ वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर महिला यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या अभियानासाठी राजीव गांधी रुग्णालयाचे स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ तसेच ठाण्यातील स्त्रीरोग रोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ आपली सेवा देत आहेत. या अभियानांतर्गत गर्भधारणापूर्व काळजी आणि मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती, पोषण या विषयांवर समुपदेशन केले जात आहे.

हेही वाचा : कचरा विल्हेवाट यंत्रात बिघाड टाळण्यासाठी ठाणे महापालिकेकडून चाळणीचा वापर

या अभियानात, सोनोग्राफी शिबीरही घेण्यात येत आहे. यामध्ये छातीचे एक्सरे, आवश्यकतेनूसार मॅमोग्राफी करण्यात येत आहे. तसेच महिला व मातांचे हिमोग्लोबीन, रक्त-लघवी यांच्या तपासण्या करण्यात येत आहे. माता-बालकांचे लसीकरणही करण्यात येत आहे. ३० वर्षावरील स्त्रीयांचे कर्करोग, रक्तदाब, मधुमेह तपासणी करण्यात येत आहे. अभियानामध्ये गेल्या दोन दिवसांत पालिकेच्या आरोग्य पथकाने सात हजार महिलांची आरोग्य तपासणी केली आहे. त्यापैकी ३ हजार ९८७ महिलांची टेंभीनाक्यावरील देवीच्या मंडपाजवळ आयोजित शिबीरात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाचे उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.

ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये दोन दिवसांत ३ हजार १३ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. त्यात वयोगटाच्या तुलनेत कमी वजन असलेल्या एकूण ९६ महिला आढळून आल्या आहेत. त्यात २ हजार ८३२ महिलांची रक्त तपासणी करण्यात आली असून त्यात उच्च रक्त दाब असलेल्या १५५ महिला, तीव्र हिमोग्लोबीनची समस्या असलेल्या ९ महिला आढळून आल्या असून त्यात नऊ गरोदर महिलांचा समावेश आहे. या सर्वांवर उपचार करण्यात येत आहेत. ६५२ महिलांना मधुमेह असल्याचे आढळून आले आहे. ५५ महिलांचे एक्सरे काढण्यात आले असून त्याचा अहवाल प्राप्त झालेला नाही. १११ महिलांची दंत तपासणी करण्यात आली, अशी माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.

हेही वाचा : “अशोक चव्हाणांचा ‘आदर्श’ सर्वांना माहिती आहे”; फडणवीस सरकार पाडण्याच्या चव्हाणांच्या आरोपावर नरेश म्हस्के यांची टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टेंभीनाका शिबीर

टेंभी नाका नवरात्रोत्सवात हजारो महिला देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यांना आरोग्य तपासणीचा लाभ मिळावा, यासाठी ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियानात हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. याठिकाणी ३ हजार ९८७ महिलांना ‘देवीचा प्रसाद’ म्हणून फोलीक ॲसीड, कॅल्शीअम, आयर्न अशी दहा दिवसांची औषधे देण्यात आली आहेत. त्यापैकी ६३७ महिलांनी आरोग्य तपासणीसाठी नोंदणी केली. त्यात ४० पेक्षा कमी वयोगटातील ३६२ तर, ४० पेक्षा अधिक वयोगटातील २७५ महिलांचा समावेश आहे. त्यापैकी ७ टक्के म्हणजेच ४५ महिलांचे वजन वयोगटाच्या तुलनेत कमी असल्याचे आढळून आले आहे. ५७ महिलांचे एक्सरे काढण्यात आले असून त्यापैकी दहा महिलांची डाॅक्टरांच्या सल्ल्याने इसीजी काढण्यात आली. या महिलांना पुढील उपचारासाठी कळवा रुग्णालयातील धर्मवीर आनंद दिघे हाॅर्ट केअर केंद्रात पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर मॅमोग्राफीचे अहवालही प्राप्त झालेले नाहीत. हिमोग्लोबीनची समस्या असलेल्या १३३ महिला, मधुमेह असलेल्या २५ महिला आढळून आल्या आहेत, अशी माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी दिली.