शहापूर : शनिवार रात्रीपासून शहापूर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, तानसा, मोडकसागर आणि मध्य वैतरणा धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भातसा धरणाचे पाचही दरवाजे तब्बल साडेतीन मीटरने उघडण्यात आल्याने, धरणातून सुमारे ६५ हजार ८१४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे सापगाव येथील भातसा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले असून, पुलाच्या पलीकडील अनेक गावांचा शहापूर शहराशी संपर्क तुटला आहे आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे भातशेतीसोबतच भाजीपाला व फळझाडांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शहापुर तालुक्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातील पाण्याची पातळी नियमित राहण्यासाठी भातसा धरणाचे पाचही दरवाजे तब्बल साडेतीन मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भातसा धरणातून तब्बल ६५ हजार ८१४ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याने सापगाव येथील भातसा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे पुला पलीकडील शेणवा, किन्हवली, डोळखांब, मुरबाड मार्गावरील अनेक गावांचा शहापुर शहराशी संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान, मुसळधार पावसामुळे मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा धरणातून ४१ हजार ९९९, मोडकसागर धरणातून ६२ हजार २६७, मध्य वैतरणा धरणातून २२ हजार ४२५ क्यूसेक्स इतका पाण्याचा विसर्ग होत असल्याचे शहापुर तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले.

मुसळधार पावसामुळे धसई जिल्हापरिषद शाळेची संरक्षक भिंत कोसळली असून या व्यतिरिक्त तालुक्यात कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. सापगाव येथील भातसा नदीवरील पूल, पिवळी – कांबारे, व वासिंद – भातसई मार्गावरील पूल आणि चरिव येथील कानवी नदी वरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने या पुलावरून खासगी वाहनांसह महामंडळाच्या बसेसची होणारी वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. महसूल विभागाकडून तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, जनावरांना चारण्यासाठी घेऊन जात असताना विजेच्या पोलवरील विजवाहक तार तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने जोरदार शॉक लागून बैलाचा तडफडून मृत्यू झाल्याची घटना शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथे शनिवारी घडली. सुदैवाने शेतकरी शांताराम भेरे यांचा जीव वाचला.