ठाणे : शिळफाटा, कल्याणफाटा भागात विकास प्रकल्पांची कामे आणि अवजड वाहनांची वाहतुक यामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी मुंब्रा बाह्यवळण मार्ग, कल्याणफाटा, शिळफाटा मार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी लागू केली आहे. ही वाहतुक ठाणे-बेलापूर मार्ग, पूर्व द्रुतगती या पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गांवर अवजड वाहनांचा भार वाढून कोंडीची शक्यता वर्तविली जात आहे. हे वाहतुक बदल पुढील दोन महिने लागू असतील. रात्री ११ ते पहाटे ५ यावेळेत अवजड वाहनांना मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा येथे वाहतुकीस मुभा असेल.

हेही वाचा >>> भूमिपूजनाला सहा महिने झाल्यावर आता तरी मीरा रोडला कर्करोग रुग्णालय होणार का? हिवाळी अधिवेशनात महत्त्वाची घडामोड…

ठाणे शहरात अवजड वाहनांना दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे पाच यावेळेत परवानगी आहे. त्यामुळे उरण जेएनपीटी बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्गे गुजरात, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने वाहतुक करत असतात. याच मार्गावरून हजारो नोकरदार नवी मुंबईत गेल्याकाही महिन्यांपासून शिळफाटा भागात उड्डाणपूलाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना करावा लागत असतो. तसेच येत्या काही दिवसांत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जलवाहिनी बदलण्याची कामे आणि बुलेट ट्रेनच्या मार्गिकेच्या निर्माणाची कामे एमआयडीसी रोड परिसरात केली जाणार आहे. एमआयडीसी मार्गावर ठाणे पोलिसांनी वाहतुक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर वाहतुक बदल लागू केले होते. या वाहतुक बदलाच्या कालावधीत महापे, शिळफाटा, कल्याणफाटा मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. बुलेट ट्रेन आणि एमआयडीसी जलवाहिनी बदलण्याची कामे येत्या काही दिवसांत केली जाणार आहे. त्यामुळे कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतुक पोलिसांनी शिळफाटा, मुंब्रा बाह्यवळण मार्गे वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना दिवसा बंदी लागू केली आहे. येथील वाहने कळंबोली, सानपाडा येथून ठाणे-बेलापूर मार्गे पटणी, ऐरोली येथून आनंदनगर टोलनाक्याच्या दिशेने वाहतुक करतील. त्यामुळे या पर्यायी मार्गावर कोंडी होण्याची शक्यता आहे. हे वाहतुक बदल शनिवारपासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील. परंतु रात्री अवजड वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी असेल.

वाहतुक बदल पुढील प्रमाणे

मुंबई नाशिक महामार्गाने उरण जेएनपीटी बंदराच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या दिशेने वाहतुक करण्यास बंदी असेल. येथील वाहने माजिवडा, आनंदनगर जकातनाका मार्गे नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– कळंबोली, महापे येथून शिळफाट्याच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना शिळफाटा येथे वाहतुक करण्यास बंदी असेल. येथील वाहने कळंबोली, सानपाडा येथून ठाणे-बेलापूर मार्गे, ऐरोली-पटणी चौक, ऐरोली टोलनाका, पूर्व द्रुतगती महामार्गाने वाहतुक करतील. – घोडबंदर येथून खारेगाव टोलनाका मार्गे उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या अवजड वाहनांना माजिवडा, खारेगाव टोलनाका येथून मुंब्रा बाह्यवळण मार्गे वाहतुक करण्यास बंदी असेल. येथील वाहने माजिवडा, आनंदनगर टोलनाका, ऐरोली टोलनाका मार्गे वाहतुक करतील.