कल्याण – डोंबिवली पश्चिमेत देवीचापाडा येथे खाडी किनारी हरितपट्टा नष्ट करून, कांदळवनाची झाडे तोडून भूमाफियांनी उल्हास खाडी पात्रात भराव केला आहे. महसूल, पालिका विभागाच्या परवानगीविना करण्यात आलेल्या या भरावाची दोन दिवसापूर्वी डोंबिवली महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. खाडी पात्रातील या बेकायदा भराव प्रकरणी पंचनामा करून महसूल अधिकाऱ्यांनी तो तहसीलदारांना पाठविला. या भराव प्रकरणाची शासनाच्या उच्चस्तर समितीकडून लवकरच पाहणी करण्यात येणार आहे, असे महसूल अधिकाऱ्याने सांगितले. डोंबिवलीतील देवीचापाडा येथील खाडी पात्रात कांदळवन नष्ट करून मातीचे भराव केल्याप्रकरणी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या निर्देशावरून डोंबिवली विभागाचे मंडळ अधिकारी रवींद्र जमदरे, ग्राम महसूल अधिकारी अरूण कासार यांनी देवीचापाडा खाडी किनारी भेट दिली. यावेळी त्यांना देवीचापाडा जेट्टी, अंत्येष्टी विधी सभागृह आणि परिसरात खारफुटीची झाडे तोडून मातीचा भराव केला असल्याचे निदर्शनास आले.
महसूल अधिकाऱ्यांनी बाजुच्या वस्तीत जाऊन हा भराव कोणी केला याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. रहिवाशांनी यासंदर्भात आपणास माहिती नसल्याचे सांगितले. ही पाहणी सुरू असताना देवीचापाडा येथील एक वयोवृध्द याठिकाणी ही जागा आमची आहे असा दावा करण्यासाठी आले होते. महसूल अधिकाऱ्यांनी ही जागा तुमची आहे तर मग हा भराव तुम्ही केला आहे का, असा प्रश्न वृध्दाला केल्यावर त्यांनी नकार दर्शविला.
हा भराव एका सुशोभिकरणाच्या कामासाठी देवीचापाडा भागातील दोन ते तीन इसमांनी शासकीय सुट्टीच्या कालावधीत केला असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. देवीचापाडा हा डोंबिवली भागातील एकमेव हरितपट्टा आहे. या भागात कोणत्याही प्रकारचे बांधकाम, खारफुटी नष्ट करण्याचे प्रकार होऊ नयेत. भराव करण्यात येऊ नयेत यासाठी काळजी घेण्याचे पत्र देवीचापाडा येथील पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर यांनी महसूल विभागाला दोन वर्षापूर्वी दिले आहे.
देवीचापाडा खाडी किनारी मागील आठ वर्षापासून पर्यावरण दक्षता मंच, इतर पर्यावरणीप्रेमी नागरिक, अभ्यासक यांच्याकडून खारफुटी, इतर झाडांचे रोपण केले जाते. या उपक्रमात पोलीस पाटील लक्ष्मीकांत भोईर नेहमी सहभागी असतात. ही रोपण केलेली सर्व झाडे भूमाफियांनी बेकायदा चाळी, मातीच्या भरावासाठी नष्ट केली आहेत.
भूमाफियांची स्थानिक पातळीवर दहशत असल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक याविषयी उघड आणि आक्रमक भूमिका घेण्यास तयार नाहीत. महसूल अधिकाऱ्यांनी देवीचापाडा येथील घटनास्थळ पाहणीचा अहवाल तयार करून तो तहसीलदारांना पाठविला आहे. या अहवालानंतर यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी शासनाची वन विभाग, सागरी मंडळ, सीआरझेड, पालिका, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची एक पर्यावरण संवर्धन समिती देवीचापाडा येथे येऊन पाहणी करेल. त्यानंतर यासंदर्भात पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल, असे महसूल अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी याच बेकायदा भराव प्रकरणी भूमाफियांवर विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.