अंबरनाथ : अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित होण्याचा मोठा फटका बसला. पडघा येथून येणाऱ्या मुख्य वाहिनीवरील गोळेगाव, आंबिवलीजवळ उच्चदाब वाहिनी तुटल्याने हा अडथळा वीज पुरवठा खंडीत झाला. हा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून किमान ४ ते ५ तासांचा अवधी लागू शकतो, अशी माहिती महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरगुती कामांपासून ते लहान-मोठ्या उद्योगांपर्यंत सर्वच ठिकाणी कामकाज ठप्प झाले आहे. या भागात आधीच वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अंबरनाथ व बदलापूर शहरांमध्ये दर दिवशी होणाऱ्या वीज कपातीमुळे पाणीपुरवठ्यावर देखील गंभीर परिणाम होत असून, पाण्याच्या टाक्यांमध्ये पुरेसा साठा न झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागत आहे.
महावितरणकडून तुटलेली वायर दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, पावसाळी हंगामात अशा अडचणी वारंवार येत असल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. “अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये वीजपुरवठ्याचा दर्जा सुधारण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे, अन्यथा पाणीटंचाई आणि दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची समस्या वाढतच जाईल,” अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
सण उत्सवापूर्वी दुरूस्ती उरका
बदलापूर आणि अंबरनाथ शहरात महावितरणाच्या देखभाल दुरूस्तीच्या कामानंतरही वीज पुरवठा सुरळीत होताना दिसत नाही. शनिवारी रक्षाबंधनाच्या दिवशीही बदलापुरात विविध ठिकाणी अनेक वेळा वीज पुरवठा खंडीत झाला. तर रविवारी सुट्टीच्या दिवशीही बदलापूर पूर्वेतील विविध भागात कमी अधिक प्रमाणात वीज पुरवठा खंडीत झाला. सोमवारचा दिवसच खंडीत वीज पुरवठ्याने उगवला. मोरिवली येथून जाणारी उच्चदाब वाहिनीत बिघाड झाल्याने बदलापुरातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे नागरिकांना पहिल्याच दिवशी त्रासाला सामोरे जावे लागेल.
सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सण उत्सवही अंधारात करावे लागत आहेत. येत्या काही दिवसात गणेशोत्सव सुरू होईल. किमान त्या काळात तरी अखंडीत वीज पुरवठा करता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून होते आहे. आणखी काही दिवस देखभाल दुरूस्ती करावी, त्यासाठी हवा तितका वेळ घ्या पण उत्सवात वीज द्या अशी मागणी होते आहे.