ठाणे : कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना कमीत कमी वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिले आहेत. तसेच निवासी डॉक्टरांच्या संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे अशा सुचनाही त्यांनी दिल्या आहेत.  महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील कामकाजाचा अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव जाधव, डॉ. स्वप्नाली कदम, डॉ. सूचितकुमार कामखेडकर, डॉ. शैलैश्वर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोठया प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्या सर्व रुग्णांना तपासणी, चाचण्या करण्यासाठी विविध विभागांमध्ये जावे लागते.

अशा वेळी संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णांची प्राथमिक तसेच आजाराबाबतची माहिती, जुने चिकीत्सा अहवाल याची माहिती अवगत असेल तर उपचार करणे सोयीचे जाते. त्यामुळे आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीद्वारे संपूर्ण रुग्णांची माहिती संगणकीकृत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्याचबरोबर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानांकनानुसार निवासी डॉक्टरांची संख्या वाढविणे, निवासी डॉक्टरांची पदोन्नती करणे, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, अधिव्याख्याता, नर्सिंग स्टाफ व टेक्निशियन यांची पदोन्नती करण्यासंदर्भातील प्रशासकीय कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.