कल्याण – चांदीच्या अंगठ्यांवर सोन्याचा वर्ख चढवून या अंगठ्या कॅरेट सोन्याच्या आहेत, असा देखावा उभा करून या बनावट सोन्याच्या अंगठ्या ठाण्यातील एका पती, पत्नी जोडप्याने कल्याणमधील दोन सराफांकडे गहाण ठेवल्या. त्यांच्याकडून प्रत्येकी तीस हजार असे एकूण ६० हजार उकळले. त्या अंगठ्या बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने सराफाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी या जोडप्यासह या अंगठ्यावर भारतीय प्रमाणीकरणाचा बनावट शिक्का मारणाऱ्या इसमाला पुण्यातून अटक केली आहे.

ही माहिती कल्याणचे साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली. कल्याण मधील प्रसिध्द सराफ पराग जैन यांच्या कल्याण पश्चिमेतील महम्मद अली चौकातील पंकज ज्वेलर्स दुकानात आणि त्यांच्या बाजुच्या संघवी छोरमल दानाजी ज्वेलर्स दुकानात हा फसवणुकीचा प्रकार करण्यात आला होता. जैन यांच्या तक्रारीवरून महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ हालचाली करून ठाणे येथील वर्तकनगर भागात राहत असलेल्या अश्विनी सागर शेवाळे आणि मयूर पाटोळे या पती, पत्नीला अटक केली आहे. बनावट सोन्याच्या अंगठ्यावर भारतीय प्रमाणीकरणाची नाममुद्रा उमटवून देणारा शरण शिलवंत याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त घेटे यांनी दिली.

शिलवंत विरूध्द पुणे पोलीस ठाणे हद्दीत एकूण पाच गुन्हे दाखल आहेत.पराग जैन यांच्या दुकानात गेल्या आठवड्यात एक जोडपे आले. त्यांनी आम्हाला पैशांची गरज आहे. आमच्याजवळ सोन्याच्या अंगठ्या आहेत. त्या गहाण ठेऊन आम्हाला ६० हजार रूपये पाहिजेत असे सांगितले. पराग जैन आणि त्यांच्या लगतच्या एका दुकानदाराने या सोन्याच्या अंगठ्या आहेत असे समजून या अंगठ्या ठेऊन घेतल्या. जोडप्याला प्रत्येक अंगठीचे एकूण ६० हजार रूपये दिले. हे जोडपे दुकानातून निघून गेल्यावर पराज जैन यांची या अंगठ्याची शुध्दता तपासली. त्या अंगठ्या बनावट असल्याचे आणि या चांदीच्या अंगठ्यांवर सोन्याचा वर्ख दिला असल्याचे आढळले. जैन यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली.

पोलिसांनी जैन यांच्या दुकानातील आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून अश्विन शेवाळे, मयूर पाटोळे या जोडप्याला अटक केली. या जोडप्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे येथून या अंगठ्यांवर बनावट नाममुद्रा उमटून देणारा शरण शिलवंत याला अटक केली. आतापर्यंत या जोडप्याने अशाप्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे, अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली.