Illegal construction case Bank accounts freeze 40 land mafias in Dombivli Investigation team ysh 95 | Loksatta

बेकायदा बांधकाम प्रकरण तापले; डोंबिवलीतील ४० भूमाफियांची बँक खाती गोठवली; तपास पथकाचा दणका

कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बनावट इमारत बांधकाम परवानग्या तयार करुन त्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (रेरा) नोंदणी प्रमाणपत्र घेऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला.

Construction of illegal buildings in Dombivli
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बनावट इमारत बांधकाम परवानग्या तयार करुन त्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (रेरा) नोंदणी प्रमाणपत्र घेऊन शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला. या बेकायदा इमारतींमधील सदनिका खरेदीदारांना बनावट कागदपत्र खरी असल्याचे दाखवून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डोंबिवलीतील ४० भूमाफियांची विविध बँकांमधील खाती तपास पथकाने गोठवली आहेत, अशी माहिती तपास पथकाचे प्रमुख, साहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील यांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे: कशेळी ते अंजुरफाट्यापर्यंतचा प्रवास नकोसा; रस्त्यांवरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण

उर्वरित २५ माफियांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांचीही बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे ते म्हणाले. गेल्या महिन्यात डोंबिवलीतील रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात पालिकेचे आरक्षित भूखंड, सरकारी जमिनी, विकास आराखड्यातील रस्त्यांवर ६५ माफियांनी पालिकेच्या परवानग्या न घेता मागील २०१९ पासून ते जून २०२२ पर्यंत बेकायदा इमले बांधले आहेत. या बांधकामांसाठी पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करण्यात आल्या आहेत. या कागदपत्रांच्या आधारे ‘रेरा’ची बनावट नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यात आली आहेत, असे स्थानिक पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत उघडकीला आले आहे.

हेही वाचा >>> ठाणे आणि भिवंडी शहरात दहा टक्के पाणी कपात; १० नोव्हेंबरपर्यंत पाणी कपात लागू राहणार

स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणाचा तपास ठेवला तर स्थानिक अधिकाऱ्यांना त्रास होऊ शकतो, हा विचार करुन या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांच्या आदेशावरुन ठाणे गुन्हे शाखेच्या अंतर्गत विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. यापूर्वीप्रमाणे हे प्रकरण दाबण्यासाठी ६५ माफियांनी तुरुंगातून सुटून आलेल्या माफियाच्या माध्यमातून मोठा दौलतजादा उभा केला आहे. परंतु हे प्रकरण विशेष तपास पथक करत आहे. या प्रकरणात आता ईडीने उडी घेतल्याने माफियांचे धाबे दणाणले आहेत. २७ गावांमधील १३ गावांच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या बेकायदा इमारत बांधकामातील ८१ माफियांपैकी अनेक माफिया रामनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल बांधकामांच्या यादीत विकासक, वास्तुविशारद म्हणून आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवलीत टोईंग वाहन सुरू; दंडात्मक कारवाईला सुरूवात

बनावट नोंदणीकरण

६५ माफियांनी बांधलेल्या बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे खरी आहेत असे दस्त नोंदणीकरण कार्यालयात दाखवून ती दस्त नोंदणीकरणाचे काम डोंबिवलीतील एका वादग्रस्त स्टॅम्प वेंडरने केले असल्याची माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे. आरोपी असलेल्या बहुतांशी भूमाफियांनी या स्टॅम्प वेंडरचे नाव तपास अधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे या वेंडरलाही लवकरच चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

जामीन नाकारले

६५ माफियांमधील अनेक माफियांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केले आहेत. या प्रकरणाची व्याप्ती या प्रकरणात विशेष तपास पथक, ईडीने उडी घेतल्याने न्यायालयाचे या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन सहा हून अधिक जणांचे जामीन फेटाळून लावले आहेत. हे माफिया जामिनासाठी उच्च न्यायालयात गेले आहेत. चारही बाजुने माफियांची कोंडी झाली आहे. यापूर्वी राजकीय आशीर्वाद घेऊन ही प्रकरणे दडपण्यासाठी माफिया पुढाकार घेत होते. आताचे राजकारण तत्पत असल्याने आणि विरोधक आक्रमक असल्याने कोणीही राजकारणी माफियांची पाठराखण करण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने माफियांची चलबिचल झाली आहे. या प्रकरणातील ६५ माफियांचे लवकरच अटकसत्र सुरू होणार असल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले.

“ ६५ विकासकांचे जबाब घेतले आहेत. त्यांच्या बनावट कागदपत्रांची छाननी केली जात आहे. या छाननीमधून ४० विकासकांची बँक खाती गोठवली. उर्वरितांचीही गोठवली जातील. या बांधकामांशी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना अत्यावश्यक माहिती दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.”

सरदार पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त, तपास पथक प्रमुख, ठाणे गुन्हे शाखा

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-11-2022 at 17:17 IST
Next Story
डोंबिवलीत टोईंग वाहन सुरू; दंडात्मक कारवाईला सुरूवात