डोंबिवली : डोंबिवलीजवळ खोणी गाव हद्दीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या दावडी गावातील एका इसमाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईवरून मानपाडा पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. या इसमाकडून गॅस सिलिंडर टाक्यांसह १४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
राज मोती यादव (४४) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. ते डोंंबिवली पूर्वेतील दावडी गाव हद्दीतील तुकाराम चौकातील जयराम गॅलेक्सी इमारतीत राहतात. कल्याण गुन्हे शाखेच्या पोलिसांना दावडी येथील एक इसम घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधील गॅस एका यंंत्राच्या साहाय्याने वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये भरून त्या सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांचे हे केंद्र काटई बदलापूर रस्त्यावरील खोणी गाव हद्दीतील तळोजा एमआयडीसी रस्त्यावर पायऱ्याचा पाडा येथे आहे.
कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी, मानपाडा पोलीस आणि अन्न आणि शिधावाटप विभागाचे अधिकारी यांनी मिळालेल्या माहितीप्रमाणे खोणी गाव हद्दीतील पायऱ्याचा पाडा येथील राज यादव यांच्या सिलिंडरच्या काळाबाजार होत असलेल्या केंद्रावर गुरुवारी संध्याकाळी छापा टाकला. त्यांचे बेकायदा उद्योग उघडकीला आणले.
कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार विजेंद्र नवसारे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की दावडी येथे राहणारे राज यादव हे खोणी गाव हद्दीत पायऱ्याचा पाडा येथे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत आहेत अशी माहिती मिळाली होती. यादव यांच्या पायऱ्याचा पाडा केंद्रावर छापा टाकला. त्यावेळी तेथे एका टेम्पोमध्ये १२६ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर होते. या सिलिंडरना एक यंत्र लावून मोजमाप मीटरद्वारे या गॅस सिलिंंडरमधील गॅस वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या टाकीत भरला जात होता.
हे वाणिज्य वापराचे सिलिंडर व्यावसायिकांना चढ्या दरात विकले जात होते. गॅस सिलिंडर हा ज्वलनशील घटक आहे. हे माहिती असुनही नियमबाह्य पध्दतीने घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस बाहेर काढून तो वाणिज्य वापराच्या सिलिंडरमध्ये भरून राजू यादव यांनी स्वतासह इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे बेकायदेशीर कृत्य केले. तसेच, घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांना कमी वजनाचे गॅस सिलिंडर देण्याची कृती करून जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे शासन आणि ग्राहकांची फसवणूक केली. या काळाबाजारातील सिलिंडरची बेकायदा वाहतूक करताना त्यांच्याकडे एकूण १३ लाख ८६ हजार रूपयांचा मुद्देमाल आढळून आला.
पोलिसांनी भारत गॅस कंपनीची दोन लाख ७० हजार रूपये किंमतीचे ६३ सिलिंडर, एचपी कंपनीचे सुमारे १५० हून अधिक सिलिंडर, गॅस भरणा यंत्र, एक टेम्पो असा एकूण १४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईच्यावेळी शिधावाटप निरीक्षक गणेश पादीर उपस्थित होते. कल्याण गुन्हे शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील याप्रकरणाचा तपास करत आहेत.