कल्याण: टिटवाळा कल्याण रस्त्यावरील काळू नदी काठच्या माळरानावर भूमाफियांनी बेकायदा चाळींची उभारणी केली होती. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर या बेकायदा चाळींची उभारणी केली असल्याची माहिती मिळाल्यावर अ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांंनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने या भागातील बेकायदा चाळी आणि चाळी उभारणीसाठी बांधलेली जोत्यांची बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने बुधवारी भुईसपाट केली.

मागील सात ते आठ महिन्याच्या काळात अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने टिटवाळा, मांडा, बल्याणी, बनेली परिसरातील सुमारे दीड हजाराहून अधिक बेकायदा चाळी, आठशेहून अधिक जोते आणि व्यापारी गाळे जमीनदोस्त केले आहेत. अनेक वर्षानंतर प्रथमच टिटवाळा परिसरात अशाप्रकारची बेकायदा बांधकामांविरुध्दची कारवाई सुरू आहे. मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या कारवाईने भूमाफियांचे कंबरडे मोडले आहे.

काळू नदी काठी टिटवाळा कल्याण या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर भूमाफियांनी बेकायदा चाळींची बांधकामे केली होती. बेकायदा चाळी उभारणीसाठी १० जोत्यांची बांधकामे केली होती. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडला तर या चाळींमुळे या भागातील वाहून जाणारे पाणी अडून राहणार होते. परिसर जलमय होण्याची भीती होती. या बेकायदा चाळीसंदर्भातची माहिती मिळताच साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी काळू नदीकाठी जाऊन या बेकायदा बांधकामांची पाहणी केली. त्यावेळी काही चाळी या त्याठिकाणी वाहन जाणार नाही अशा ठिकाणी बांधल्या असल्याच्या निदर्शनास आले. तर काही चाळी सपाट माळरानावर बांधल्या होत्या.

पाऊस सुरू होण्यापूर्वी या बेकायदा चाळी, तेथील जोते तोडणे आवश्यक असल्याने साहाय्यक आयुक्त पाटील यांंनी अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली टिटवाळा कल्याण रस्त्यावरील काळू नदी काठच्या बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केल्या. तसेच, ज्या ठिकाणी जेसीबी तोडकामासाठी जाऊ शकत नव्हता. त्याठिकाणी हातोड्यांच्या साहाय्याने चाळी भुईसपाट करण्याची कारवाई करण्यात आली.

या बेकायदा चाळी तोडून भूमाफियांचे सुमारे ५० ते ६० लाख रूपयांचे नुकसान करण्यात आले. या माफियांनी पुन्हा बेकायदा चाळी उभारणीसाठी पुढाकार घेऊ नये अशाप्रकारची कारवाई याठिकाणी करण्यात आली, असे साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी सांगितले. अ प्रभाग हद्दीत टिटवाळा परिसरात कोठेही परवानगीविना बांधकाम सुरू असेल तर ते तातडीने तोडण्याची कारवाई अ प्रभागाकडून केली जाते. मागील आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या या कारवायांमुळे स्थानिक रहिवासी समाधानी आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क प्रभागात कारवाई

पालिकेच्या क प्रभागात कल्याण पश्चिम डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील पाठारे नर्सरी परिसरात तनजीप कांबळे या भूमाफियाने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता १० खोल्यांचे बेकायदा बांधकाम केले होते. हे बेकायदा बांधकाम साहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.