डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव-नांदिवली पंचानंद येथील जमीन मालक जयेश म्हात्रे यांची वडिलोपार्जित जमीन हडप करून त्यावर स्थानिकांच्या मदतीने बेकायदा बांधकामाची उभारणी करणारा श्री स्वस्तिक होम्सचा विकासक मयूर रवींद्र भगत यांना मानपाडा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. जुलैमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून विकासक भगत फरार होते.

नांदिवली पंचानंद येथे जमीन मालक जयेश म्हात्रे आणि भावंडांची वडिलोपार्जित मालकीच्या जमिनीवर श्री स्वस्तिक होम्सचे मयूर रवींद्र भगत यांनी गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत सात माळ्याची बेकायदा इमारत उभारली. या इमारतीच्या उभारणीसाठी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्या तयार करण्यात आल्या. सचिन विष्णू पाटील आणि इतरांच्या नावाने या बनावट परवानग्या साहाय्यक संचालक यांची बनावट स्वाक्षरीने तयार करण्यात आल्या. या आधारे भगत आणि साथीदारांनी महारेराचा बनावट नोंदणी क्रमांक मिळविला.

हेही वाचा >>> कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड कुटुंबात उमेदवारी दिल्यास शिवसेनेचे महेश गायकवाड यांचा बंडखोरीचा इशारा

ही इमारत अधिकृत आहे असे दाखवून या बेकायदा इमारतीमधील सदनिका १३ घर खरेदीदारांना साहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग दोन कार्यालयातून दस्त नोंदणी करून विकण्यात आल्या. असे जमीन मालक जयेश म्हात्रे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

पालिकेच्या नगररचना विभागाने जयेश यांना दिलेल्या पत्रात राधाई इमारतीला पालिकेने बांधकाम परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे. या बेकायदा बांधकाम प्रकरणात संजय विष्णू पाटील, सचिन विष्णू पाटील, राधाबाई विष्णू पाटील आणि सुरेश मारूती पाटील यांचाही सहभाग असण्याची शक्यता वर्तवून जयेश म्हात्रे यांनी त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे ते बदलापूरपर्यंतच्या शहरांमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे

जुलैमध्ये गुन्हा दाखल झाल्यापासून विकासक मयूर भगत फरार होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आणि त्यांचे पथक मयूर यांचा शोध घेत होते. पोलिसांनी त्यांना गुरुवारी शिताफीने अटक केली. मयूर यांच्या चौकशीनंतर या गुन्ह्यातील इतर साथीदार आता चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जमीन मालक मारहाण बेकायदा राधाई इमारत पालिकेने भुईसपाट केली आहे. या इमारतीच्या जागेवरील ढिगारा उपसण्याचे काम सुरूआहे. या इमारतीच्या जागेवर अतिक्रमण करू नये असा फलक जमीन मालक जयेश यांनी दोन दिवसापूर्वी लावला होता. हा फलक अज्ञातांनी काढून चोरून नेला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुध्द अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी जयेश राधाई इमारतीच्या जागेवर पुन्हा नवीन फलक लावण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी गेले होते. तेथे संजय पाटील, सचिन पाटील (रा. बाळाराम भवन, संजयनगर, सागाव) आले. पाटील बंधूंंनी या जागेवर आमचा ताबा आहे. येथे फलक लावून देणार नाही. तु आमचे नुकसान केले आहेस, ती भरपाई केल्याशिवाय आम्ही तुला सोडणार नाही, असे बोलून जयेश यांना मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वीच जयेश यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.