किशोर कोकणे

ठाणे : जागतिक मंदीमुळे निर्यातीवर झालेला परिणाम आणि इतर देशांमधून चोरटय़ा मार्गाने भारतात येणारे कापड यामुळे भिवंडीमधील यंत्रमाग उद्योग संकटात सापडला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत, १ ते २० नोव्हेंबर असे तब्बल २० दिवस शहरातील यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय उद्योजकांनी घेतला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने यंत्रमाग उद्योगाकडे लक्ष देणे आवश्यक आहे अशी त्यांची मागणी आहे.

यंत्रमागाचे शहर अशी भिवंडीची ओळख आहे. शहरातून कच्चा कापड, तयार कापड यासह कापडी वस्तूंची मोठय़ा प्रमाणात निर्यातही होते. एका यंत्रमागावर दररोज सरासरी ५० ते ८० मीटर कापड तयार होते. मात्र जागतिक मंदीच्या सावटामुळे निर्यात पूर्ण क्षमतेने होणे अवघड झाले आहे. त्यामुळे कारखानदार भारतीय बाजारपेठांमध्ये कापडाची विक्री करत आहेत. मात्र चीन, व्हिएतनाम, बांगलादेश, इंडोनिशिया, मलेशिया, थायलंडसह अन्य देशांतून कापड भारतीय बाजारांत येत आहे. परिणामी, भिवंडीतील कापडाची मागणी घटली आहे. एकीकडे मालास उठाव नसल्याने गोदामे व कारखान्यांमध्ये पडून असलेले गठ्ठे आणि कारखाना चालविण्यासाठी हाताबाहेर जाणारा दैनंदिन खर्च या कात्रीमध्ये कारखानदार अडकले आहेत. त्यामुळे कारखाना सुरू ठेऊन तोटा वाढविण्यापेक्षा यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘व्यापारी एकता ग्रुप’ या संघटनेची नुकतीच बैठक झाली. भिवंडीतील ७०० यंत्रमाग मालक यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कापडाच्या ओझ्याखाली यंत्रमागांची घुसमट१ ते २० नोव्हेंबर या कालावधीत यंत्रमाग बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याचे यंत्रमाग व्यवसायिक सरोज फक्की यांनी सांगितले.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील पलावा वसाहतीमधील रहिवाशांना दिलासा; मालमत्ता करात ६६ टक्के सवलत

दिवाळीत घरी बसण्याची वेळ

करोना साथ येण्यापूर्वी शहरात सात ते साडेसात लाख यंत्रमाग होते. परंतु टाळेबंदीचा फटका बसल्याने यातील अनेक कारखाने बंद पडले. काही व्यवसायिकांनी कारखाने परराज्यांत नेले. सध्या शहरात चार लाखांच्या आसपास यंत्रमाग असून कामागारांची संख्या तीन लाखांवरून दीड लाखांवर आली आहे. असे असले तरी आजही यंत्रमागांमधून वर्षांला सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ऐन दिवाळीत कारखाने बंद राहणार असल्याने याचा फटका लाखो कामगारांसह उद्योगावर विसंबून असलेल्या मजूर, वाहतूकदार, खानवळ चालक आदी व्यवसायांनाही बसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारकडून मदतीची अपेक्षा

  • ’भिवंडीतून युरोप, इस्त्रायल, सौदी अरेबिया, कतार, इराक, मेक्सीको, ब्राझिल, अर्जेटिना, घाना, नायझेरिया या देशांत कापडाची निर्यात होते.
  • ’मात्र गेल्या काही महिन्यांत निर्यातीत घट झाली आहे. त्यातच चीनमधील काही व्यापारी बांगलादेशात कंपन्या स्थापन करून त्यांच्यामार्फत छुप्या मार्गाने कापड भारतात निर्यात करतात.
  • ’चीनमध्ये उद्योगाला अनेक सवलती असल्यामुळे तेथील कापड स्वस्त असते. त्या तुलनेत भारतात तयार झालेले कापड महाग असल्याने त्याला देशांतर्गत बाजारात उठाव नाही.
  • ’त्यामुळे राज्य व केंद्र सरकारने यात लक्ष घालून प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा कारखानदार व्यक्त करीत आहेत.

जगभरात मंदीचे सावट असल्याने कापड निर्यात होत नाही. त्यातच चीन, व्हिएतनाम, बांगलादेश यासह आसियान देशांतून भारतात कापडाची आयात होते. हा माल स्थानिक बाजारपेठेत हा माल विक्रीसाठी येत असल्याने भिवंडीतील कारखान्यांत तयार कापड पडून आहे. –  पुनित खिमशिया, हलारी पावरलुम असोसिएशन