ठाणे : ठाणे येथील किसननगर भागात सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजनेचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून त्यापाठोपाठ टेकडी बंगला, हाजुरी व किसननगर क्लस्टरचा काही भागात क्लस्टर योजनेच्या काम सुरू होणार आहे. याच कामासंदर्भात बुधवारी महात्मा फुले नुतनीय उर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेबरोबर ठाणे महापालिका प्रशासनाने करार केला आहे. त्यामुळे टेकडी बंगला, हाजुरी भागातील नागरिकांना मालकी हक्काची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा, यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण  क्षेत्रफळ १५०० हेक्टर एवढे आहे. एकूण ४५ पैकी ६ क्लस्टरची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यात, कोपरी, राबोडी, किसननगर, लोकमान्यनगर, हाजुरी, टेकडी बंगला या भागांचा समावेश आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्प्यातील काम किसननगरमध्ये सुरू झाले आहे. सिडको मार्फत हे काम करण्यात येत आहे. त्याच टप्प्यातील टेकडी बंगला, हाजुरी व किसननगर परिसरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने बुधवारी महात्मा फुले नुतनीय उर्जा व पायाभूत सुविधा तंत्रज्ञान लिमिटेड (महाप्रीत) या शासकीय संस्थेबरोबर करार केला.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत ‘पीओपी’च्या गणेश मूर्ती वापरावर बंदी

या करारावर ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आणि महाप्रीतचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी स्वाक्षरी केल्या. महाप्रीत ही कंपनी गृहनिर्माण क्षेत्रातील परवडणारी घरे, शहरी व प्रादेशिक नियोजन तसेच पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रात कार्यरत आहे. तसेच महाप्रीत संस्थेकडे प्रधानमंत्री आवास योजना, आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पाचा अनुभव आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत क्लस्टरच्या अंमलबजावणीस चालना मिळणार आहे. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाल्याने आणि त्याची अंमलबजावणी कालबद्ध पध्दतीने पूर्ण होणार असल्याने नागरिकांना मालकी हक्काच्या घरात राहण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योजनेची वैशिष्ट्ये

अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३  चौ. फूट मालकी हक्काचे घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम  सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त व दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई अशा नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जात आहे.