Ganeshotsav 2025 : ठाणे – मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून जगभरात ओळखली जाते आणि या शहराला घडवण्यात कष्टकरी मराठमोळ्या जनतेचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या श्रमांमुळे, आर्थिक उलाढालीतून दिलेल्या पाठबळामुळे आणि संस्कृती टिकवून ठेवण्याच्या जिद्दीमुळेच मुंबई आज जागतिक पातळीवर नावारूपाला आली आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने अंबरनाथ येथील नाडकर कुटुंबीयांनी यंदा जुनी मुंबईचा देखावा साकारत मराठमोळ्या जनतेचे यातून कौतुक केले आहे.
गणेशोत्सव हा केवळ भक्तीचा नाही तर समाजजागृती आणि सांस्कृतिक मूल्ये जपण्याचा उत्सव आहे. या उत्सवाच्या माध्यमातून अनेक नागरिक विविध सामाजिक संदेश देणारे, विविध कलाकृतींचे दर्शन घडविणारे देखावे उभारत असतात. या देखाव्यांना पाहण्यासाठी नागरिक आवर्जून भेट देखील देतात. अंबरनाथ येथील नाडकर कुटुंबीय दरवर्षी विविध कलाकृतींचे दर्शन घडविणारे देखावे गणेशोत्सवाला उभारत असतात. यंदा त्यांनी जुन्या मुंबईचा आणि मुंबईची मराठमोळी संस्कृती दर्शविणारा देखावा उभारला आहे.
यावेळी त्यांनी देखाव्यात कोळी बांधव, समुद्र, मुंबईतील जुनी चाळ, लोकल, मुंबईचे डब्बेवाले अशा विविध प्रतिकृती या देखाव्यात उभारण्यात आल्या आहेत. या देखाव्याचा मुख्य हेतू म्हणजे कष्टकरी जनतेचे महत्त्व अधोरेखित करणे, त्यांच्या श्रमाला सलाम करणे तसेच मुंबईचे मराठमोळेपण आणि संस्कृती आजच्या पिढीपुढे उभे करणे हा आहे. देखावा साकारण्यासाठी क्ले, कार्डबोर्ड पुठ्ठा आणि घरगुती टाकाऊ तसेच पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. सुमारे एक महिन्याच्या मेहनतीनंतर हा देखावा उभा राहिला असून त्यासाठी संपूर्ण कुटुंबाने स्वतःहून हातभार लावला. या देखावा उभारणीचे काम उमेश नाडकर, स्मिता समीर राजे आणि स्वप्नाली समीर राजे यांनी स्वतःहून पार पाडले, तर रोषणाईसाठी अजित मोडक यांनी विशेष परिश्रम घेतले.