बदलापूरः प्रदुषणामुळे आधीच गटारगंटा होण्याच्या मार्गावर असलेल्या उल्हास नदीत मातीचा भराव टाकून संरक्षण भिंत बांधण्याचा प्रयत्न बदलापुरात झाला आहे. स्थानिक नागरिकांनी राजकीय पक्षांच्या माध्यमातून आंदोलने केल्यानंतर अखेर तहसिल प्रशासनाने याबाबत कारवाईसाठी पाउले उचलली. त्यामुळे स्थानिकांचे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे बदलापुरात ज्या भागात पूरस्थिती निर्माण होते त्याच भागात नदी पात्रात भर घालण्याची हिंमत होतेच कशी असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
उल्हास नदी सध्या राज्यातील प्रदुषीत नद्यांमध्ये अग्रस्थानी असलेली नदी म्हणून ओळखली जाते आहे. सर्वाधिक नागरी आणि औद्योगिक सांडपाणी, सर्वाधिक कचरा याच नदीमध्ये विसर्जीत केला जातो आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य शहरांना याच उल्हास नदीतून पाणी पुरवठा केला जातो. मात्र प्रदुषणामुळे याच उल्हास नदीला दरवर्षी जलपर्णीचा विळखा बसतो. त्यातच नदीच्या विविध भागात नदीपात्रात भर घातली जात असल्याचे दिसून आले आहे.
बदलापूर शहराला उल्हास नदीला आलेल्या पुराचा फटका दरवर्षी बसत असतो. शहरातून वाहणारे नैसर्गिक नाले स्थानिक बांधकाम व्यावसायिकांनी राजकीय आशिर्वादाने याआधीच अरूंद केले आहेत. त्यामुळे उल्हास नदीला आलेल्या पुराची झळ सर्वसामान्यांना बसत असते. नाल्यांची रूंदी कमी झाल्याने दरवर्षी होत असलेले परिणाम उघड असतानाही उल्हास नदीच्या पात्रात पुन्हा एकदा मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्थानिकांनी याबाबतचे छायाचित्र प्रसारीत केल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे काम सुरू राहिल्यास येत्या पावसाळ्यात आणखी काही इमारती आणि सध्या पुराच्या पाण्यात वेढल्या जाणाऱ्या दोन मजली इमारतीही पाण्याखाली जातील, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली. मात्र त्यानंतरही हे सुरूच राहिल्याने रहिवाशांनी धरणे आंदोलन केले. मनसेच्या संगिता चेंदवणकर आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही मंगळवारपासून येथे आमराण उपोषण सुरू केले होते. याबाबत माहिती मिळताच तहसीलदार कार्यालयाने याठिकाणी वापरलेल्या मोठमोठी यंत्रे, पोकलेन, जेसीबी जप्त केले आहेत. तसेच काम करणाऱ्यांवर दंड बसवून नोटीस बजावली. तर नगरपालिका प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असून प्रशासनाकडून चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
कुणाच्या आशिर्वादाने प्रताप ?
शहरातील नागरिकांना पुराच्या पाण्यात ढकलण्यासाठी कुणाच्या आशिर्वादाने नदी पात्रात भर टाकली जात होती असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. शहरातील काही मोठे राजकारणी एकमेकांवर टीका करण्यात व्यग्र आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नावर नागरिकांनीच आवाज उठवल्याने लोकप्रतिनिधी हवेत कशाला असा प्रश्न उपस्थित होतो आहे.