ठाणे – भिवंडी वाडा मार्गावरील खड्ड्यामुळे एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. यश मोरे असे या मुलाचे नाव असून याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आणि कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात २० जुलै रोजी झाला होता, परंतु बुधवारी यश याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यश याच्या मृत्यूनंतर स्थानिक रहिवासी आक्रमक झाले यावेळी त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
भिवंडी येथील मडक्याचा पाडा परिसरात यश मोरे हा राहत होता. २० जुलैला तो त्याच्या मित्रासह दुचाकीने व्यायामशाळेत जात असताना त्याची दुचाकी खड्ड्यामध्ये आदळली. या घटनेत यश आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. दोघांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर बुधवारी सकाळी यश मोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळाल्यानंतर स्थानिक आक्रमक झाले. यश याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे भिवंडी वाडा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली त्यामुळे नोकरदार आणि वाहन चालकांचे हाल झाले.
अपघातात जबाबदार असलेले कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी ताब्यात घेणार नाहीत असा पवित्रा यश याच्या नातेवाईकांनी घेतला होता. घटनेची माहिती ठाणे ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली. तसेच गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक मागे हटले. अखेर यश चा मृतदेह त्याच्या नातेवाईकांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.