डोंबिवली – डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकातील कल्याण दिशेकडील पश्चिम बाजुकडील सरकता जिना गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या अवस्थेत आहे. कोपर रेल्वे स्थानकात पश्चिम बाजुला उतरण्यासाठी सरकता जिना नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. वळसा घेऊन प्रवाशांना इच्छित स्थळी जावे लागते. कोपर रेल्वे स्थानकात मध्य रेल्वे स्थानकावरील कोपर रेल्वे स्थानक आणि दिवा-वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानक अशी दोन स्थानके आहेत. कर्जत, कसारा ते डोंबिवली, कल्याण परिसरातील वसई, विरार, डहाणू, वापी, गुजरातकडे जाणारा बहुतांशी नोकरादर, व्यापारी दररोज मध्य रेल्वेच्या तळ भागातील कोपर रेल्वे स्थानकात उतरून मग अप्पर कोपर रेल्वे स्थानकात जाऊन ते पनवेल, वसई, विरार, डहाणू, पालघर भागातील प्रवास करतात. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची दोन्ही रेल्वे स्थानकातील प्रवाशांची अधिक प्रमाणात गर्दी असते.
या प्रवाशांना रेल्वे स्थानकातून येजा करण्यासाठी कल्याण दिशेकडे पश्चिम बाजुला सरकता जिना नसल्याने वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते. डोंबिवलीतील अनेक प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दीला कंटाळुन कोपर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बसण्यासाठी येतात. याशिवाय मोठागाव, कोपर, जुनी डोंबिवली, ठाकुरवाडी भागात जाणारे बहुतांशी प्रवासी कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करतात. त्यामुळे कोपर रेल्वे स्थानकातील गर्दीचे प्रमाण अधिक आहे.
कोपर रेल्वे स्थानकातील गर्दी विचारात घेऊन गेल्या वर्षी कोपर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजुला कल्याण दिशेने एक सरकता जिना उभारणीचे काम घाईने मध्य रेल्वे प्रशासनाने सुरू केले होते. लवकरच सरकता जिना सुरू होणार म्हणून प्रवासी समाधानी होते. सरकत्या जिन्याचे थोडे काम पूर्ण झाल्यानंतर जिना उभारणीचे काम नंतर थंडावले. आता वर्ष उलटले तरी जिन्याचे काम पूर्ण होत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. कोपर पश्चिम बाजुला सरकता जिना नसल्याने हदयरोग असलेला नोकरदार, ज्येष्ठ, वृध्द यांना जिन्याचा आधार घेत त्रास सहन करत कोपर रेल्वे स्थानकात यावे लागते.
यासंदर्भात रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, सरकत्या जिन्याचे काही सुट्टे भाग मिळत नसल्याने हे काम रखडले आहे. हे काम लवकरच सुरू होईल यासाठी रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली असताना सरकत्या जिन्यांची अनेक रेल्वे स्थानकांमध्ये कामे सुरू आहेत. मग कोपर रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याला सुट्टे भाग का मिळत नाहीत, असे प्रश्न प्रवासी करत आहेत.
डोंबिवली रेल्वे स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम मागील सहा महिन्यांपासून रखडले होते. ते आता सुरू करण्यात आले आहे. कोपर रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्यावर धुळीचे थर साचले आहेत. भटकी कुत्री याठिकाणी येऊन आराम करतात. एकीकडे रेल्वे स्थानके स्वच्छ ठेवण्याची अभियाने सुरू असताना कोपर रेल्वे स्थानकातील रखडलेल्या सरकत्या जिन्यावरील धूळ झटकण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची मागणी प्रवासी करत आहेत.