डोंबिवली – डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक भागात घनश्याम गुप्ते रस्त्यावर गोमांतक बेकरी भागात मंगळवारी संध्याकाळी वस्तू विक्री व्यवसाय करण्याच्या जागेच्या वादातून महिला बचत गटाच्या महिला आणि फेरीवाला महिलांमध्ये जोरदार राडा झाला. आक्रमक असलेल्या परप्रांतीय फेरीवाला महिलांनी ही जागा आमची आहे, असा आक्रमक पवित्रा घेत स्थानिक महिला बचत गटाच्या महिलांना फराळ आणि इतर वस्तू विक्री करण्यास जोरदार विरोध केला. अखेर संतप्त झालेल्या फेरीवाला महिलांमधील एक वृध्दा, एका महिलेने आपल्या कडेवरील बाळासह अंगावर डिझेल ओतून घेतले.

महिला बचत गटातील या राड्याची माहिती मिळताच विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम चोपडे, पालिका ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. डोंबिवली पश्चिमेतील ह प्रभाग फेरीवाला हटाव पथकातील कामगारांच्या पाठबळामुळेच पश्चिमेतील फेरीवाले दिवस, रात्र रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करतात, अशा नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आहेत.

डोंबिवली पश्चिमेत घनश्याम गुप्ते रस्ता, पंडित दिनदयाळ रस्ता, महात्मा फुले रस्ता, महात्मा गांधी रस्ता या वर्दळीच्या रस्त्यांवर फेरीवाल्यांनी पालिका कामगारांच्या आशीर्वादाने आपल्या व्यवसायाच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्या जागेत अन्य कोणी व्यवसाय करण्यास आला की फेरीवाले त्यांना तेथून हाकलून लावतात. गुप्ते रस्त्यावर श्री वल्ली महिला बचत गट संस्थेला दिवाळीनिमित्त फराळ आणि इतर वस्तू विक्री करण्याची पालिकेच्या ह प्रभागाने परवानगी दिली आहे.

गोमांतक बेकरी समोरील रस्त्यावर या संस्थेने आपला वस्तू विक्रीचा मंच उभा केला आहे. या जागेवर तुम्ही व्यवसाय करायचा नाही. ही आमची वर्षानुवर्षाची जागा आहे. याठिकाणी आम्हीच व्यवसाय करणार, असा आक्रमक पवित्रा घेत परप्रांतीय महिला फेरीवाला विक्रेता महिलांनी श्री वल्ली संस्थेच्या महिलेच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला.

आम्ही पालिकेची परवानगी घेऊन याठिकाणी चार दिवस वस्तू विक्री व्यवसाय करणार आहोत, असे सांगूनही फेरीवाला महिला ऐकण्यास तयार नव्हत्या. आमच्या जागेवर व्यवसाय करायचा नाही, असा आक्रमक पवित्रा घेत फेरीवाला महिला श्री वल्ली महिला संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धाऊन गेल्या. यावेळी झालेल्या झटापटीत एक फेरीवाला महिलेने आपल्या कडेवर लहान बाळ असताना रागाच्या भरात जवळ असलेल्या बाटलीतील इंधन अंगावर ओतून घेतले. यामधील काही इंधन लहान बाळाच्या अंगावर पडले.

आता ही महिला जीवाचे बरेवाईट करेल म्हणून इतर पादचाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या महिलेला रोखले. ही माहिती विष्णुनगर पोलिसांना देण्यात आली. पालिकेचे फेरीवाला हटाव पथकाचे कामगार घटनास्थळी धाऊन आले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटाच्या महिलांना शांत केले. परवानगी असलेल्या महिला बचत गटाला त्याठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी दिली.

डोंंबिवली पश्चिमेत रस्ते अडवून राजकीय आशीर्वादाने फटाके विक्री, फराळ विक्रीचे मंच उभारण्यात आले आहेत. डोंबिवली पश्चिमेत फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असुनही पालिका अधिकारी ठोस आक्रमक भूमिका घेत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.