डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीचा अलीकडेच बनविण्यात आलेल्या नेहरू मैदान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारे पादचारी, प्रवासी, विद्यार्थी आणि पालक हैराण आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू होते. आता या रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबू लागल्याने या रस्त्याच्या कामाविषयी नागरिक शंका घेऊ लागले आहेत.

शासन निधीतून एमएमआरडीएमार्फत या रस्त्यांची कामे सुरू आहेत. बापूसाहेब फडके रस्त्यावरून नेहरू मैदानाकडून वाहने कल्याण डोंबिवली रस्ता, छत्रपती शिवाजी चौककडे निघून जातात. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये आहेत. दोन ते तीन महिन्यांपासून नेहरू मैदान रस्त्याची टप्प्याने कामे सुरू होती. रस्ता काँक्रीटचा होत असल्याने नागरिक समाधानी होते. आता पाऊस सुरू झाल्यानंंतर या काँक्रीट रस्त्यावर पाणी तुंबू लागले आहे. मुसळधार पाऊस सुरू असला की हा रस्ता जलमय होतो. त्यामुळे वाहन चालकांना कसरत करून वाहने चालवावी लागतात. पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने जावे लागते. विद्यार्थी, पालकांना वाहनांचे पाणी अंगावर उडणार नाही याची दक्षता घेत शाळेचा रस्ता धरावा लागतो.

या रस्त्याच्या एका भागात भुयारी गटार आहे. हे गटार उंच आणि रस्ता त्याच्या खाली असे चित्र येथे आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी याठिकाणी सुयोग्य व्यवस्था नसल्याने हे पाणी तुंबत असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी, व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. काँक्रीट रस्त्यावर सतत पाणी तुंबून या भागात रस्त्याला शेवाळ पकडण्याची भीती नागरिकांना आहे. या शेवाळावरून पाय घसरून पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँक्रीट रस्त्यावरील पावसाचे तुंबलेले पाणी भुयारी गटारातून वाहून जाईल अशीही व्यवस्था याठिकाणी नाही. पालिका अधिकारी, रस्ता ठेकेदार यांनी समन्वयाने हे पाणी तुंबणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. डोंबिवली एमआयडीसीत नवे कोरे काँक्रीट रस्ते फोडण्याची कामे गेल्या वर्षापासून सुरू आहेत. शहरात काँक्रीट रस्ते जलमय होण्याचे प्रकार सुरू झाल्याने या काँक्रीट रस्त्यांच्या बांधणीचे नियोजन कोणी केले आहे, असे प्रश्न जाणकारांकडून उपस्थित केले जात आहेत.