कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात झाडांवर नियमबाह्य पद्धतीने विद्युत रोषणाई केल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वीच झाडांवर रोषणाई करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. कल्याण डोंबिवली शहरात काही आस्थापनांकडून हे आदेश धाब्यावर बसवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने मागील दोन वर्षांत ४०० हून अधिक झाडांवर लावलेली रोषणाई काढून टाकली आहे. तसेच, काही व्यावसायिक आस्थापनांवर झाडांवर नियमबाह्य विद्युत रोषणाई केल्याबद्दल थेट पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, सार्वजनिक झाडांवर कोणतीही बाह्य वस्तू विशेषतः विद्युत उपकरणे लावणे पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन मानले जाते. झाडांच्या खोडावर रोषणाईसाठी विद्युत रोषणाई केल्याने त्यांवरील जैवविविधतेला धोका निर्माण होतो. वाढ खुंटते आणि काही वेळा झाड वाळण्याची शक्यताही निर्माण होते. शिवाय, अशा प्रकारच्या सजावटीमुळे विजेचा अपव्यय होतोच, शिवाय वीज गळती किंवा झाडाला आगीचा धोका देखील संभवतो.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी अशा प्रकारे रोषणाई केली जात असल्याचे आढळते, तेथे तत्काळ नोटीस बजावून आवश्यक ती कारवाई केली जाते. तरीही काही व्यापारी, हॉटेल चालक, ढाबे मालक, ब्युटी पार्लर आस्थापना या नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनांना विरोध करत, महापालिकेने अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. वृक्षांची निगा राखणे आणि पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी असून, कायद्याचे पालन करूनच शहराचा विकास होऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डोंबिवली मध्ये मागील काही महिन्यांपासून टिळक रस्त्यावरील ब्युटी पार्लर दुकान, नांदिवली, देसले पाडा येथील ढाबे चालकांनी आपल्या दुकानासमोरील झाडांना विद्युत रोषणाई केली आहे. डोंबिवली उद्यान विभागाचे अधीक्षक महेश देशपांडे यांनी या परिसराची पाहणी करून संबंधित आस्थापनांना या संदर्भात नोटीस देण्यात येईल आणि कारवाई केली जाईल असे सांगितले.