कल्याण: कल्याण पूर्व भागात विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळील सत्यम या महिला सेवा बारवर मानपाडा पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री अकरा वाजता छापा टाकला. या छाप्याच्यावेळी अनेक महिला सेविका तोकडे कपडे घालून वाद्यवृंदाच्या तालावर नृत्य करत ग्राहक सेवा देत होत्या. तर उपस्थित ग्राहक त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचे पोलिसांना आढळले.विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक भागातील सत्यम महिला सेवा बार रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. या महिला सेवा बारमध्ये वाद्यवृंदाच्या तालावर सेवक महिला तोकडे कपडे घालून अश्लिल नृत्य करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला मिळाली होती.
वरिष्ठांच्या सूचनेवरून मानपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी रात्री अकरा वाजता सत्यम महिला सेवा बारवर छापा टाकला. त्यावेळी वाद्यवृंदाच्या तालावर ‘लैला हो लैला कैसी हो लैला’ हे गाणे मोठ्या आवाजात सुरू होते. या गाण्यांच्या तालावर आठ महिला गायिका गाणे गात तोकडे कपडे घालून अश्लिल हावभाव, बीभत्स वर्तन करत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून नृत्य करत होत्या. या महिला सेविकांना भुलून ग्राहक जवळील पैसे त्यांच्यावर उधळत होते.
पोलिसांना पाहताच काही ग्राहकांनी बारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी बारचे दोन्ही बाजुचे दरवाजे बंद केले होते. पोलिसांनी बारमधील ग्राहकांसह सर्वांना एकाच जागी थांबण्याची सूचना केली. या महिला सेवा बारमध्ये पालघर, वांगणी, वासिंद, शहापूर, उल्हासनगर, जव्हार, नाशिक, शीव, कल्याण परिसरातून ग्राहक मौजमजेसाठी येत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले.
आठ महिला गायिका या नवी मुंबई, पलावा, ठाणे परिसरात राहत असल्याचे पोलिसांना समजले. ग्राहकांनी महिलांवर उधळलेले पैसे व्यासपीठावर पडले होते. वाद्यवृंदासह पोलिसांनी एकूण ४७ हजार रूपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले.मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार सोपान शेळके यांच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सत्यम महिला बारचे चालक गिरीश गौडा, व्यवस्थापक राजेश शर्मा, तरूण चौधरी, वाद्यवृंद वादक सचिन शर्मा, सिताराम नाईकवाडी, रोखपाल आनंद बंगेरा, कान्हुचरण मलिक यांच्यावर गुन्हे दाखल केले. याशिवाय आठ पुरूष सेवक, २२ ग्राहक आणि आठ महिला गायिका यांच्यावर गुन्हे दाखल केले.
हवालदार बुधवंत याप्रकरणाचा तपास करत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून दररोज रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या महिला सेवा बारवर पोलिसांनी छापा सत्र सुरू केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.