कल्याण – तुझ्या मैत्रिणीने तुझ्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. असे कल्याण पश्चिमेतील एका सोळा वर्षाच्या बालकाला एका जीम प्रशिक्षकाने सांगितले. त्या बालकाला घाबरून सोडून त्याच्याकडून हे सर्व प्रकरण मिटवण्यासाठी टप्प्याने एकूण २३ तोळे सोने उकळले. बालकाने हे सर्व सोन्याचे दागिने आपल्या आईने घरात ठेवलेल्या कपाटातून चोरले आणि जीम प्रशिक्षकाला दिले आहे. अलीकडे हा सर्व प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी जीम प्रशिक्षका विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. बालकाचे वडील व्यावसायिक आहेत. आई शिक्षिका आहे.

पोलीस ठाण्यातील माहिती अशी, की सोळा वर्षाचे बालक कल्याण मधील आपल्या घर परिसरातील व्यायामशाळेत व्यायामासाठी जात होते. तेथे त्याची ओळखी एक जीम प्रशिक्षकाशी झाली. प्रशिक्षकाने बालकाची ओळख त्याच्या मैत्रिणीशी करून दिली. मैत्रिण आणि बालक यांचे नियमित मोबाईल, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून बोलणे होत होते. जीम प्रशिक्षकाने एकदा बालकाला संपर्क करून आपल्या मैत्रिणीशी तु बोलणे बंद कर. ती मैत्री करण्याच्या पात्रतेची नाही. प्रशिक्षकाने आदेश दिल्याने बालकाने त्या तरूणीशी बोलणे बंद केले.

एक दिवस प्रशिक्षकाने बालकाला माझ्या मैत्रिणीने तुझ्या विरुध्द बाजारपेठ पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराची तक्रार केली आहे, असे सांगितले. हा प्रकार ऐकून बालक हादरले. इयत्ता बारावीत असलेले हे बालक अस्वस्थ झाले. हे प्रकरण मिटविण्यासाठी जीम प्रशिक्षकाने बालकाकडे चाळीस हजार रूपयांची मागणी केली. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे सांगितल्यावर तु तुझ्या घरात असलेले सोन्याचे दागिने आणून दे असे धमकावात सांगितले.

एक दिवस जीम प्रशिक्षक बालकाला बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या दिशेने घेऊन गेला. प्रशिक्षक स्वता पोलीस ठाण्यात गेला आणि बालकाला पोलीस ठाण्यापासून दूर अंतरावर उभे ठेवले. तेथून परतल्यावर प्रशिक्षकाने तुझे प्रकरण मिटवले. मी माझ्याजवळील चाळीस हजार पोलिसांना दिले, असे खोटे सांगितले. हे पैस मला तु परत करत असे सांगितले. बालकाने घरातील तिजोरीत असलेल्या आईचे सोन्याचे दागिने शोधून ते एकेक करून प्रशिक्षकाला देण्यास सुरूवात केली. दागिने मिळत गेले तसा प्रशिक्षक विविध कारणे देऊन बालकाकडून पैशाची मागणी करून दागिने उकळू लागला.

आता हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. तु पैसे दिले नाही तर तुला तुरुंगात जावे लागेल अशी भीती प्रशिक्षकाने बालकाला घातली. हे प्रकरण मिटावे म्हणून बालकाने घराच्या तिजोरीतील आईच्या सोन्याच्या बांगड्या, हार, अंगठ्या असा एकूण २३ तोळ्याचा सोन्याचा ऐवज प्रशिक्षकाला दिला. याशिवाय आईचे एटीएम कार्ड चोरून त्यामधून प्रशिक्षकाने सोन्याचे दागिने खरेदीसाठी पैसे काढले.

बालकाच्या आईने रमझान सणाच्या दिवशी दागिने घालण्यासाठी तिजोरी पाहिली तर त्यात खडखडाट होता. घरात चोरी झाली नसता दागिने गेले कोठे म्हणून पालकांनी बालकाला विश्वासात घेतले. त्यानंतर बालकाने घडला प्रकार सांंगितला. जीम प्रशिक्षकाची लबाडी उघड केली. बालकाच्या माहितीवरून पालकांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.