कल्याण – दहावी नापास झालेला मुलगा सतत घरात बसून मोबाईलवर विविध खेळ खेळतो, इन्स्टाग्रामची हाताळणी करतो. म्हणून वडील आपल्या १५ वर्षाच्या मुलाला सारखा मोबाईल हातात घेऊ नकोस. तो मोबाईल ठेऊन दे. माझ्या मोबाईलवर इन्स्टाग्राम कशासाठी सुरू केलय, असे प्रश्न वडिलांनी आपल्या मुलाला रविवारी रात्री केले. त्याचा राग मुलाला आला. रात्रीच्या वेळेत जरा बाहेर जाऊन येतो सांगून अल्पवयीन मुलगा घर सोडून निघून गेला आहे. सर्वदूर शोधूनही मुलगा कुठेच न आढल्याने त्याला अज्ञातांनी फूस लावून पळवून नेले असण्याचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पंधरा वर्षाचा हा अल्पवयीन मुलगा कल्याण पश्चिमेतील संतोषी माता रस्त्यावरील रामबागेतील मसालेवाले चाळ भागात आपल्या कुटुंबीयांसह राहतो. या मुलाचे वडील मुंबईत अंधेरी साकीनाका भागात मासे विक्रीचा व्यवसाय करतात. या कुटुंबीयांमधील १५ वर्षाचा अल्पवयीन मुलगा जोशी बागेतील एका शाळेत दहावीचे शिक्षण घेत होता. परंतु, दहावीच्या परीक्षेत तो नापास झाला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला त्याची अभ्यासातील प्रगती पाहून पुढचे शिक्षण न देता घरात बसून ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

मुलगा घरात बसून असल्याने तो सतत मोबाईलवर व्यस्त असायचा. तू मोबाईलवर जास्त राहू नकोस. त्यामुळे त्रास होऊ शकतो, असा समजूतदारपणाचा सल्ला या अल्पवयीन बालकाचे वडील दररोज आपल्या मुलाला देत होते. आई मुलाला सारखे मोबाईलवर राहू नकोस म्हणून समजून सांगत होती. मुलगा त्यांचे काही ऐकण्यास तयार नव्हता. रविवारी रात्री साडे नऊ वाजता वडील व्यवसाय करून घरी आल्यावर त्यांना मुलगा मोबाईलवर खेळत असल्याचे दिसले. तसेच त्याने आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टाग्राम स्थापित केले असल्याचे दिसले. या माध्यमाची आपणास गरज नाही. ते तू कशाला स्थापित करून घेतलेस, असे प्रश्न करत वडिलांनी बालकाच्या हातामधील मोबाईल काढून घेतला.

या सगळ्या प्रकाराचा या अल्पवयीन मुलाला राग आला. त्याने रागाच्या भरात घराच्या बाहेर जाण्याची तयार केली. वडिलांनी त्याला आता रात्रीच्या वेळेत तू बाहेर कोठे जात आहेस असे प्रश्न करून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मुलाने मी अर्धा तासाठी बाहेर जात आहे. परत येतो, असे वडिलांनी सांगितले. त्यानंतर वडिलांनी मुलाला बाहेर जाऊ दिले. रात्रीचे साडे दहा वाजले मुलगा घरी येत नाही म्हणून मुलाच्या कुटुंबीयांनी घर परिसर, नातेवाईक, मुलाचे मित्र यांच्या घरी तपास केला. कोठेही मुलगा आढळून आला नाही. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात कुटुंबीयांनी मुलाचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. त्यामुळे मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले असल्याचा संशय व्यक्त करत कुटुंबीयांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.