लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण पूर्व भागातील विजयनगर मधील एका सोसायटीत राहत असलेल्या पती-पत्नीमधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना रविवारी रात्री मध्यरात्री संतप्त पतीने लाथाबुक्क्यांनी केली. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा आरोपी पतीवर दाखल करण्यात आला आहे.

नागेशनाथ निवृत्ती घुगे (३४), हवालदार सांगळे अशी मारहाण झालेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदारांची नावे आहेत. या प्रकरणात तक्रारदार महिलेचा पती महेश माने (रा. धनलक्ष्मी सोसायटी, विजयनगर, कल्याण पूर्व) याच्या विरुध्द हवालदार घुगे यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा…. ठाणे: आरटीई प्रवेशाची पहिली यादी जाहीर; २५ एप्रिलपर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन

पोलिसांनी सांगितले, रविवारी रात्री साडे बाराच्या दरम्यान ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील विजयनगर भागातील एका सोसायटीत पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत आहे. त्या महिलेला मदतीची गरज असल्याने तातडीने त्याठिकाणी जाण्याच्या सूचना वरिष्ठांनी हवालदार घुगे, सांगळे यांना केल्या. पोलीस तक्रारदार महिलेच्या घरी गेल्यावर तेथे पती महेश माने हा पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला मारहाण करत होता. घुगे, सांगळे हवालदारांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. तुम्ही मला सांगणारे कोण, असा प्रश्न करत आरोपी महेश याने पोलिसांना मारहाण, शिवीगाळ करत त्यांना घराबाहेर फरफटत नेले. इमारतीखालील वाहनतळावरील दुचाकीवर हवालदार घुगे यांना लोटून दिले. त्यांना गंभीर दुखापत झाली.

हेही वाचा…. काँग्रेसच्या नेत्यांची ठाणे पोलीस आयुक्तांना भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतप्त महेश दोन्ही पोलिसांना दाद देत नसल्याने पोलिसांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून वाढीव कुमक मागविली. साहाय्यक पोलीस निरीक्षक माने आणि शोध पथक घटनास्थळी आहे. त्यांनी महेशला पोलीस ठाण्यात आणले. त्याच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.