कल्याण – कल्याण पश्चिमेतील गणेशघाट भागातील प्रेम ऑटो चौकात परिसरातील नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या शासकीय कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील कॅमेऱ्यांच्या १६ विजेऱ्या (बॅटरी) चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. अशाप्रकारे विजेऱ्या चोरीस नेऊन यंत्रणा बंद पाडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुध्द कॅमेरा नियंत्रक कंपनीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार केली आहे.

कल्याण पश्चिमतील वैकुंठधाम स्मशानभूमी भागातील गणेशघाट भागात प्रेम ऑटो चौकात एका कंपनीने परिसर नियंत्रणासाठी शासकीय कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून परिसराचे नियंत्रण केले जाते. या नियंत्रण ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांच्या मुख्य नियंत्रण पेटीतील एकूण १६ विजेऱ्या (बॅटरी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या दरम्यान चोरून नेल्या आहेत. या विजेऱ्यांची बाजार भावाची किंमत ८० हजार रूपये आहे.

कॅमेऱ्यातील विजेऱ्या काढून नेल्यानंतर त्या भागातील यंत्रणेवर परिणाम झाला. त्याची माहिती कंपनी नियंत्रकांना समजताच त्यांनी मुख्य नियंत्रण कक्षाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना चोरट्यांनी विजेऱ्या चोरून नेल्याचे समजले. कॅमेरा नियंत्रण कंपनीचे अधिकारी शिशीर भोगले यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. हवालदार साळुंखे याप्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चोरट्यांनी या विजेऱ्या भंगारात देण्यासाठी चोरून नेल्याचा असण्याचा संशय पोलिसांना आहे. अनेक विजेऱ्यांमध्ये तांब्याची वेट्टोळी असतात. बॅटऱ्या फोडल्यानंतर ही वेट्टोळी बाहेर काढून मग ती चोरटे भंगार विक्रेत्यांना विकतात. त्यासाठीच ही चोरी झाली असण्याचा पोलिसांना संशय आहे.