कल्याण : टिटवाळा जवळील म्हसकळ गाव हद्दीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सख्खे बंधू आशीष फडणवीस यांचे भागीदारीमध्ये गृह प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या बांधकामाच्या ठिकाणी मंगळवारी बांधकाम साहित्य पुरविण्यावरुन पुरवठादार आणि कामाच्या ठिकाणचे ठेकेदार, कामगार यांच्यात आर्थिक व्यवहारांवरुन वादावादी झाली. यावेळी पुरवठादार आणि त्याच्या १० जणांनी विकासक फडणवीस यांच्या ठेकेदार आणि कामगारांना हाॅकी स्टीकने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

टिटवाळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बांधकाम साहित्य पुरवठादार संदीप तरे आणि इतर १० जणांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे टिटवाळा विभागाचे उपविभाग प्रमुख आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, टिटवाळा जवळील म्हसकळ येथे कलश दर्शन नावाने विकासक आशीष फडणवीस यांचे भागीदारीतून गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. या गृह प्रकल्पासाठी बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम करण्यासाठी विकासक फडणवीस यांनी एक ठेकेदार नियुक्त केला आहे. या ठेकेदाराने स्थानिक रहिवासी म्हणून संदीप तरे यांना बांधकाम साहित्य पुरविण्याचे काम दिले आहे.

हेही वाचा : डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर बेकायदा इमारतीची उभारणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बांधकाम साहित्य पुरवण्यातील आर्थिक व्यवहारातून तरे आणि विकासकाचा ठेकेदार यांच्यात धुसफूस सुरू होती. ही धुसफूस वाढल्याने मंगळवारी पुरवठादार संदीप तरे आणि त्यांच्या समर्थक १० जणांनी म्हसकळ येथील कलश दर्शन प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन तेथील ठेकेदार आणि कामगारांना हाॅकी स्टीकने बेदम मारहाण केली. या मारहाणीत ठेकेदारासह कामगार गंभीर जखमी झाले. या मारहाणीनंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या प्रकल्पावरील ठेकेदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी १० जणांच्या विरुध्द खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांचा टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पथक शोध घेत आहे.