ठाणे : येथील लोकमान्यनगर भागातील टीएमटी आगारासमोरील रस्त्याचे काम सुरू असून गुरूवारी सकाळी या कामादरम्यान, रस्त्याखाली असलेली जलवाहीनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. यामुळे वाहिनीवरून पाणी पुरवठा होत असलेल्या सावरकरनगर म्हाडा वसाहतींचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारी दुरुस्ती कामानंतर येथील पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.
ठाणे येथील लोकमान्यनगर परिसरात टिएमटीचा आगार आहे. या आगारासमोरील रस्ता काँक्रीटचा करण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान, रस्त्याखाली असलेली मलनिस्सारण चेंबर खचले होते. त्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्याने रस्ते काम लांबणीवर पडल्याचे चित्र आहे. त्यातच रस्ते कामासाठी खोदकाम करण्यात आल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना करावा लागत आहे. असे असतानाच, गुरूवारी सकाळी या रस्ते खोदकामादरम्यान रस्त्याखालून जाणारी जलवाहीनी फुटली.
सावरकनगर येथील जलकुंभातून परिसरातील म्हाडा वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठी ८ इंची जलवाहीनी टाकण्यात आली आहे. ही वाहीनी फुटल्याने परिसरचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता. जलवाहीनी फुटून लाखो लीटर पाणी वाया गेले. याबाबत माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने घटनास्थळी धाव घेऊन दुरुस्तीचे काम हाती घेतले. या कामानंतर गुरुवारी दुपारी परिसराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला.