ठाणे – कल्याण तालुक्यातील दावडी येथील एका अनधिकृत खासगी शाळेचा मनमानी कारभार उघड झाला आहे. जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या कारवाईकडे दुर्लक्ष करून शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ठेवले आहे. संबंधित शाळेकडे मान्यता पत्रच नसतानाही सुमारे ३०० विद्यार्थी सध्या येथे शिक्षण घेत आहेत. अनेक वेळा नोटीस बजावूनही शाळा बंद करण्यास व्यवस्थापन नकार देत असल्याने अखेर प्रशासनाने शाळेच्या बाहेर “ही शाळा अनधिकृत असून नव्याने प्रवेश घेऊ नये” असा स्पष्ट मजकूर असलेला फलक लावला आहे.

खोटी प्रमाणपत्र दाखवत, मोठ्या रक्कमेची शालेय शुल्क आकारून अनेक अनधिकृत शैक्षणिक संस्थांनी फसवणूक केल्याची प्रकरणे अनेकदा उघड झाली आहे. मात्र या सगळ्या गैरप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांची आणि पालकांची नाहक फरफट होते. यामुळे अशा अनधिकृत पद्धतीने चालणाऱ्या शाळांविरोधात शिक्षण विभागाकडून वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. याच पद्धतीने कल्याण तालुक्यातील दावडी येथील एक शाळा अनधिकृत पद्धतीने सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले. यावेळी संबंधित शाळेकडे इरादा पत्र आहे मात्र शाळेला मान्यता पत्र प्राप्त नसल्याचे समोर आले असल्याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. शिक्षण विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही शाळा केवळ परवानगीशिवाय चालवली जात नाही, तर तिच्या अनेक शाखादेखील परिसरात सुरू आहेत. शिक्षण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाने वारंवार कारवाई केली, नोटिसा बजावल्या, दंडात्मक कारवाईची केली. तरीही शाळा व्यवस्थापनाने नियमांचे उल्लंघन करतच वर्ग सुरू ठेवले आहेत.

पालक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करता प्रशासनाने शाळा तातडीने बंद करण्याचे आदेश जारी केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून व्यवस्थापनाने शाळा सुरूच ठेवली, परिणामी प्रशासनाने कठोर भूमिका घेत शाळेच्या बाहेरच “ही शाळा अनधिकृत असून यात प्रवेश घेऊ नये असा आशयाचा फलक लावून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. मात्र या प्रकारामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्नही उपस्थित झाला आहे. प्रशासनाकडून पालकांना सूचित करण्यात आले आहे की, या शाळेत नवीन प्रवेश घेऊ नयेत.

शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर अशा घटना समोर येत असल्याने पालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांनी प्रशासनाने कठोर पावले उचलून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर अंकुश आणावा, अशी मागणी करीत आहेत.

शाळेकडे कोणत्याही प्रकारचे मान्यता पत्र नसल्याने शाळा अनधिकृत ठरविण्यात आली आहे. तसेच शाळेवर वेळोवेळी कारवाई देखील करण्यात आली आहे. – कुंदा मेश्राम, गटशिक्षण अधिकारी