ठाणे – शहरात नऊ वर्षांपूर्वी जीवे ठार मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भपात करण्यास लावणाऱ्या आकाश मारुती हटकर (२८) याला ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांनी दोषी ठरवत, १० वर्ष सक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ठाणे शहरात जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ चे दरम्यान आरोपी आकाश मारूती हटकर (२८) याने अल्पवयीन मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी देत, तीच्या सोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. घडलेला प्रकार कोणास सांगितल्यास कुंटुंबीयांना जिवे ठार मारण्याची धमकी तीला दिली.
तसेच आरोपी आणि त्याची आई रेखा हटकर (४८) या दोघांनी तिला जबरदस्तीने गर्भपात कर नाहीतर तुझी बदनामी करू अशी धमकी देत, गर्भपात करण्यास भाग पाडले. या घडलेल्या प्रकाराबाबत अल्पवयीन मुलीने नौपाडा पोलीस ठाण्यात आरोपी आकाश हटकर आणि रेखा हटकर यांच्याविरुध्द तक्रार दिली होती. या गुन्हयात मायलेकांना अटक करण्यात आली होती.
याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील आणि त्यांचे तपास पथकाने भक्कम पुरावे गोळा करून आरोपी विरूध्द ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या गुन्हयाची सुनावणी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश देशमुख यांच्या समोर झाल्यावर बलात्काराच्या गुन्हयातील आरोपी आकाश हटकर याला १० वर्ष सश्रम कारावास आणि ५० हजार रूपये दंडाची रक्कम भरली नाही तर, एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याची आई रेखा हटकर यांती या गुन्हयातून निर्दोष मुक्तता केली आहे.