ठाणे : लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघातील लोकसभा निवडणूकांमधील इंडिया आघाडी आणि महायुतीचे उमेदवार ठरले आहेत. असे असले तरी या मतदार संघातून काही अपक्ष आणि स्थानिक लहान पक्षाकडूनही उमेदवार दिले जातात. ज्या उमेदवारांच्या हाती ५० हजार किंवा त्यापेक्षाही कमी रोकड आहे. अशा उमेदवारांनीही आपली उमेदवारी दाखल केली आहे. यामधील काही उमेदवारांकडे स्वत:ची किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या नावे स्थावर मालमत्ताही नाही. त्यामुळे कोट्यधीश उमेदवारांसमोर काही हजार रुपये घेऊन लढणारे उमेदवारही रिंगणात उभे असल्याचे समोर येत आहे.

ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघ आहे. या तिन्ही मतदारसंघात इंडिया आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. असे असले तरी काही अपक्ष, स्थानिक तसेच लहान पक्षांच्या उमेदवारांनीही त्यांचे नशीब आजमाविण्याचा निर्णय घेतला आहे. २६ एप्रिलपासून पाचव्या टप्प्यातील निवडणूकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. ३ मे या दिवशी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारिख आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळे उमेदवारांची अर्ज दाखल करण्यासाठी लगबग सुरू आहे.

हेही वाचा : ठाणे मतदारसंघात भाजपमध्ये नाराजीनाट्य ; नवी मुंबई, भाईंदरच्या पदाधिकाऱ्यांचे सामुदायिक राजीनामे

ठाणे लोकसभेत बुधवारपर्यंत आठ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचा सामावेश आहे. तर महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. कल्याण लोकसभेच्या जागेसाठी सहा आणि भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या दोन्ही मतदारसंघात महायुती आणि इंडिया आघाडीने उमेदवार जाहीर केले आहेत. या तिन्ही लोकसभेच्या जागा चुरशीच्या मानल्या जात आहेत. भिवंडी वगळता इतर दोन जागांवर महायुती आणि इंडिया आघाडी अशी थेट लढत आहे. असे असले तरी काही अपक्षांनीही उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचे उमेदवार कोट्यधीश असले तरी काही उमेदवार हे केवळ ५० हजार किंवा त्यापेक्षा कमी रोकड हाती घेऊन निवडणूक लढवित आहेत. तिन्ही मतदारसंघात हाती ५० हजारहून कमी रोकड असलेल्या उमेदवारांची संख्या सहा आहे. यातील काही जणांकडे दुचाकी वाहन आहे. तर काहीजणांकडे ते वाहन देखील नाही. या सर्व उमेदवारांकडे स्थावर मालमत्ता नाही. यातील बहुतांश उमेदवार स्थानिक पक्षासंबंधीत आहेत.

हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : राज्यात महायुतीची लाट – मुख्यमंत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५० हजारहून कमी रोकड असलेल्या उमेदवारांची संख्या

भिवंडीत एकूण पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे. त्यापैकी एका उमेदवाराच्या हातात ५० हजार रुपये आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सुरेश म्हात्रे, भाजपकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे हे कोट्यधीश उमेदवार या मतदारसंघात उभे आहेत. ठाणे मतदारसंघात आठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी तीन उमेदवारांकडे ५० हजाराहून कमी रक्कम हाती असून एका उमेदवाराकडे केवळ पाच हजार रुपये हाती आहेत. तर कल्याण मतदारसंघात सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी दोघांकडे ५० हजारहून कमी रोकड आहे.