ठाणे : कोपरी येथे शीतपेयांची घाऊक दरात विक्री करणाऱ्या व्यवसायिकाकडून खंडणी मागण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी संबंधित व्यवसायिकाने कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे सनी तेलुरे आणि मनीष जयस्वाल या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. खंडणी मागताना त्यांनी व्यवसायिकाला ‘ठोकू क्या तेरे को’ अशी धमकी देखील दिली.

कोपरी भागात शीतपेय विक्रीचे घाऊक दुकान आहे. ठाण्यातील दुकानदार त्यांच्या दुकानात विक्रीसाठी लागणारे शीतपेय या व्यवसायिकाकडून घेऊन जात असतात. गुरुवारी मध्यरात्री ते दुकानाच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी सनी तेलुरे आणि मनीष जयस्वाल हे दोघे दुचाकीने त्याठिकाणी आले. त्यावेळी त्यांची सनी आणि मनीष या दोघांनी अडविली. त्यानंतर तेलुरे यांनी त्यांना धमकी दिली.

तेलुरे त्यांना म्हणाला, ‘तु येथे बऱ्याच वर्षांपासून व्यवसाय करतो, त्यामुळे आतापासून तु मला ५० हजार रुपये देणार आहेस.’ त्यावर व्यवसायिकाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी तेलुरे याने पुन्हा त्यांना धमकी दिली. माझ्याशी पंगा घेणाऱ्याचे काय हाल होतात हे माहित नाही तुला असे म्हणत तेलुरे याने त्याच्याकडील चाकू बाहेर काढला. तरीही व्यवसायिकाने पैसे दिले नाही म्हणून त्या दोघांनी व्यवसायिकाला शिवीगाळ केली तसेच कोणत्याही पोलिसाला बोलव आमचे कोणीही काही करु शकत नाही म्हणत तेथून निघून गेले. व्यवसायिक दुकानात आल्यावर त्यांनी याबाबतची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिली.

काही वेळाने तेलुरे आणि जयस्वाल पुन्हा तेथे आले. ‘आए क्या तेरे पुलीस वाले, ठोकू क्या तेरे को…’ असे म्हणत तेथून निघून गेले. यानंतर व्यवसायिकाने याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, कोपरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२६ (२), ३ (५), ३०८ (४), ३५१ (३) आणि ३५२ कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.