ठाणे : लोकसभा निवडणूकीत बोगस मतदान झाल्याचा आरोप अनेकदा ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केला होता. त्याबाबत ते न्यायालयातही गेले होते. त्यांनी आता अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. यादी बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमचे लक्ष आहे. त्यांनी बोगस नावे यादीत टाकली तर त्यांना सोडणार नसल्याचा इशारा विचारे यांनी दिला आहे. नेमके विचारे हे काय म्हणाले वाचूया.
शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेची ठाण्यात एकत्रित पत्रकार परिषद आज तीन हात नाका येथील टीप टॉप पार पडली. या पत्रकार परिषदेला माजी खासदार राजन विचारे, मनसे नेते अविनाश जाधव, मनसे माजी आमदार राजू पाटील, अभिजित पानसे, शिवसेना (ठाकरे गट ) ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला संघटक रेखा खोपकर, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, शहर प्रमुख अनिश गाढवे उपस्थित होते.
ठाण्यात पहिल्यांदाच दोन्ही पक्षांचा एकत्रित मोर्चा काढण्यात येणार असून दोन्ही पक्ष ताकद दाखवणार आहेत. या मोर्चात जवळपास हजारोंच्या संख्येने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि सुज्ञ नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी दुबार मतदानाबाबत राजन विचारे यांना विचारले असता, लोकसभा निवडणूकीत १ लाख ६१ हजार दुबार नावे मिळाली. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर पुराव्यासकट आम्ही दुबार नावे दिली होती. परंतु एकही नाव कमी झाले नाही. विधानसभा निवडणूकीत सहा विधानसभा मतदारसंघात १ लाख ७१ हजार मतदार दुबार निघाली. ही नाव आजही तशीच्या तशी आहेत. त्यांनी त्यांचे काम केले आता आम्ही आमचे काम सुरु केले आहे. ही यादी बनविण्याचे काम महापालिकेवर होते. कुठल्याही अधिकाऱ्याने बोगस नावे केली. तर त्याला आम्ही सोडणार नाही. त्या अधिकाऱ्याच्या घराबाहेर काय करायचे ते आम्ही करू. आम्ही कोर्ट-कचेऱ्या केल्या. आता आमचा यादी बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर लक्ष आहे. त्यांनी बोगस नावे टाकण्याची कामे केली. तर त्याला आम्ही सोडणारन नाही असे राजन विचारे म्हणाले.