ठाणे – घोडबंदर येथील कासारवडवली परिसरात शनिवारी पहाटे टँकर आणि ट्रकमध्ये झालेल्या अपघातात टँकर चालक जखमी झाला. राकेशकुमार (२८) असे जखमी टँकर चालकाचे नाव असून त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. अपघातामुळे ठाणे येथून घोडबंदर कडे जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.

सिन्नर येथून शिवडी येथे जाण्यासाठी टँकर चालक राकेशकुमार (२८) हे घोडबंदर मार्गे वाहतूक करत होते. यावेळी टँकर मध्ये ३२ हजार लिटर ऑइल होते. या ऑइलची वाहतूक करत असताना शनिवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास राकेश कुमार हे घोडबंदर येथील कासारवडवली परिसरात असलेल्या पंचामृत बस थांबाजवळ आले. त्यावेळी टँकर मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चालक राकेश कुमार यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे टँकरच्या समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागच्या बाजूने धडक बसली.

हा ट्रक चालक पनवेल येथून सुरतला जात होता. या ट्रकमध्ये १० टन लाकूड होते. या घटनेत ट्रक चालकाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. परंतु टँकर चालक राकेशकुमार हे केबिनमध्ये अडकल्याने त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच, ठाणे वाहतुक पोलीस, कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या राकेश कुमार यांना बाहेर काढून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातामुळे ठाणे येथून घोडबंदर कडे जाणारी वाहतूक सुमारे ४० मिनिटे धीम्या गतीने सुरू होती. पथकांनी अपघातग्रस्त टँकर हायड्रा या यंत्राच्या साहाय्याने अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर बाजुला करून वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्त टँकर मध्ये असलेले ऑइल सुरक्षित असून त्यामुळे कोणताही धोका निर्माण झाला नाही.