ठाणे : शिवसेनेतील उठावाचे केंद्रबिंदू आणि सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरावर ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रीत केले असून उद्या, रविवारी सायंकाळी ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ठाण्यातील शाखांना भेटी देऊन पदाधिकाऱ्यांची संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे. ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील पालिकांवर आजवर शिवसेनेची सत्ता कायम राहिली आहे. शिवसेनेतील उठावानंतर जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठे समर्थन मिळाले असून सद्यस्थितीत मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जात आहे.

हेही वाचा : “चिंगारी भडकी है तो… ये आग कळवा-मुंब्रा तक भी जाएगी”, आनंद परांजपे यांचा जितेंद्र आव्हाड यांना इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवसेनेतील उठावानंतर पहिल्यांदाच लोकसभेची निवडणुक होणार असून त्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी सुरू आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे हे ठाकरे गटात आहेत. ही जागा पुन्हा जिंकण्यासाठी ठाकरे गटाकडून व्युहरचना आखली जात असून ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून रविवारी सायंकाळी ५ वाजता ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. ठाण्यातील आनंदनगर, मनोरमानगर, चंदनवाडी आणि जिजामातानगर या शाखांना आदित्य हे भेटी देणार असून तेथील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी सुरू आहे.