कल्याण: गणेशोत्सवाच्या अकरा दिवसाच्या कालवधीत गणपती विसर्जन मिरवणुका येथील दुर्गाडी किल्ला गणेशघाट भागात निघणार आहेत. या कालावधीत शहरात वाहन कोंडी नको म्हणून वाहतूक विभागाने कल्याण शहरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. अनंत चतुर्थीपर्यंत वाहन चालकांना या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाट यांनी केले आहे. ८ सप्टेंबर, दीड दिवसाचे गणपती , अडीच दिवस, पाच दिवस, सात दिवस ते १७ सप्टेंबर, अनंत चतुर्थीपर्यंत वाहन चालकांना पर्यायी रस्ते मार्गाचा अवलंब करायचा आहे.

रस्ते बंद

आधारवाडी चौक ते दुर्गामाता चौक, सहजानंद चौक ते दुर्गामाता चौक, उर्दू स्कूल परिसरात रस्त्यांच्या दोन्ही बाजुला सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. भिवंडी कोन भागातून दुर्गाडी पुलावरून येणारी सर्व प्रकारची हलकी वाहने वाडेघर चौक, आधारवाडी चौकातून इच्छित स्थळी जातील. शिळफाटा, पत्रीपूलमार्गे येणारी सर्व वाहने गोविंदवाडी वळण रस्त्याने इच्छित स्थळी जातील. भिवंडी, कोनगावकडून पत्रीपूल, शिळफाटा, डोंबिवलीकडे जाणारी सर्व हलकी वाहने दुर्गाडी येथून गोविंदवाडी वळण रस्त्याने जातील. दुर्गामाता चौक दुर्गाडी किल्ला भागात मिरवणुकांमुळे कोंडी झाल्यास या मार्गावरील सर्व वाहतूक गांधारी पूल मार्गे येवई (पडघा) नाक्याकडे आणि कल्याण शहरात येणारी वाहतूक येवई नाक्याकडून गांधारी पूलमार्गे होईल.

हेही वाचा : कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीसमोर नग्न होणाऱ्या वडिलांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवजड वाहने प्रवेश बंद

गणपती विसर्जन दिवशी सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात वाहतुकीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून विसर्जन पूर्ण होईपर्यंत प्रवेश बंद राहील. सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसना दुर्गाडी ते शिवाजी चौकमार्गे वाहतुकीला बंदी आहे. भिवंडी कोन भागातून येणाऱ्या बस गोविंदवाडी वळण रस्ता येथून पत्रीपूल, वल्लीपीर रस्ता, गुरुदेव हाॅटेलमार्गे कल्याण आगारात येतील. मुरबाड रस्त्याने येणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवासी बसना प्रेम ऑटो येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. या बस बिर्ला महाविद्यालय रस्ता, खडकपाडा, दुर्गाडी, गोविंदवाडी रस्ता, वल्लीपीर रस्ता मार्गे शहरात येतील.