ठाणे : नाशिकमधील एका डाॅक्टरसोबत मैत्रीकरून त्याच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तसेच खंडणीची रक्कम दिली नाही म्हणून त्याच्या हत्येची सुपारी देण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. महिलेला हातोहात पकडण्यासाठी पोलिसांनी एक बनावट मारेकरी तिच्याकडे पाठविला होता. ठोस पुरावे गोळा केल्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

ठाण्यातील बाळकूम भागात संबंधित महिला राहते. तिचे नाशिकमधील एका डाॅक्टरसोबत मैत्री होती. काही महिन्यांपासून ती संबंधित डाॅक्टरकडे ५० लाख रुपयांची मागणी करत होती. परंतु डाॅक्टरने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्या डाॅक्टरची हत्या घडवून आणण्यासाठी ती मारेकरीच्या शोधात होती. याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्याआधारे, पोलिसांनी एका व्यक्तिला बनावट मारेकरी म्हणून त्या महिलेशी संपर्क साधण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्या व्यक्तिने १६ जानेवारीला महिलेला संपर्क साधून तिची कापूरबावडी भागात भेट घेतली.

हेही वाचा : बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी साकार केले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तिने डाॅक्टरची हत्या करायची असल्याचे त्या व्यक्तिला सांगितले. महिलेने डाॅक्टरचे छायाचित्र, व्हिजीटिंग कार्ड, त्याच्या क्लिनिकचा पत्ता, तेथे येण्या-जाण्याच्या वेळेची माहिती दिली. महिला निघून गेल्यानंतर संबंधित व्यक्तिने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या व्यक्तिला तिच्यासोबत होणारे संभाषण ध्वनीमुद्रीत करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या व्यक्तिने महिलेची भेट घेऊन डाॅक्टरला कसे मारायचे याबद्दल विचारले असता, तिने त्या व्यक्तिला एक इंजेक्शन आणि एक विषारी रसायन दिले. तसेच मारण्याच्या बदल्यात त्याला तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले. १९ जानेवारीला त्याने महिलेला व्हाॅट्सॲप व्हिडीओ काॅल करून नाशिक येथे पोहचल्याबाबत सांगितले. त्यानंतर महिलेने १९ हजार ९९० रुपये त्या व्यक्तिच्या बँक खात्यात पाठविले. पोलिसांकडे पुरावे उपलब्ध झाल्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन अटक केली.