जयेश सामंत

ठाणे: महायुतीला अधिकची ताकद मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट नवनिर्माण सेनेला लोकसभेच्या काही जागा सोडण्याबाबत घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाल्याची विश्वसनीय वृत्त आहे. मनसेला जागा वाटपात ज्या जागा हवे आहेत त्यातील बहुसंख्य जागा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. या जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला देण्यास शिंदे यांच्या सेनेत तीव्र विरोध होऊ लागला असून मुख्यमंत्र्यांनीही या संबंधीच्या भावना महायुतीच्या बैठकीत व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असतानाच मशिदी वरील भोंग्यां वरून राज ठाकरे यांनी रान उठविले होते.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात येताचं राज यांच्या महायुतीच्या नेत्यांसोबत बैठका सतत होत होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षां निवासस्थानी दिवाळीला गणपतीला भेटी देणं तसेच वेगवेगळ्या प्रश्नांच्या निमित्ताने बैठका घेण्याचे सत्रही या काळात सुरू झाले होते. लोकसभा निवडणुकीचा रणशिंग फुंकले जाताचं मनसेचा महायुतीत समावेश करण्यासंबंधीच्या हालचालींना जोर आला होता. दिल्ली येथे जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज कोणत्याही क्षणी महायुतीत सहभागी होतील असेच चित्र होते. दरम्यान मनसेने महायुतीच्या जागा वाटपात दक्षिण मुंबई कल्याण आणि शिर्डी या तीन मतदारसंघांवर दावा केल्याच्या वृत्तामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. कल्याण हा एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांचा मतदारसंघ असून कोणत्याही परिस्थितीत याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा चांग त्यांनी बांधला आहे. याशिवाय दक्षिण मुंबईची जागा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असतानाही भाजपाच्या आग्रहामुळे हा मतदारसंघ शिंदे यांनी सोडल्याची चर्चा होती. या ठिकाणी मनसेकडून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी राज स्वत: प्रयशील असल्याचे बोलले जाते. याशिवाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे खासदार सदाशिव लोखंडे यांना पोषक चित्र नसल्यामुळे येथून उमेदवार बदलावा अथवा ही जागा भाजपाने लढवावी असा एक प्रस्ताव आहे.

हेही वाचा >>>अजित पवारांच्या आदेशाने कळव्यातील मैदानाला टाळे लागल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “नको ती दादागिरी…”

या मतदारसंघावर ही मनसेने दावा केलाय. या घडामोडींमुळे मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत कमालीची अस्वस्थता असून जागावाटपकाच्या चर्चेत मनसेला एकही जागा सोडू नये अशी भूमिका पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांना सहभागी करून घ्यावे आणि विधान परिषद अथवा राज्यसभेच्या जागांचा प्रस्ताव त्यांच्यासमोर सध्या ठेवावा असा महायुतीत आणि विशेषता शिवसेनेत सूर आहे. कल्याण लोकसभेत शिवसेनेपेक्षा मनसेचे स्थानिक आमदार राजू पाटील यांना भविष्यात श्रीकांत शिंदे यांच्या मदतीची अधिक गरज लागणार आहे. राजू पाटील यांच्या विरोधात शिवसेनेकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून दिव्यातील माजी उपमहापौर रमाकांत मडवी यांना तयारीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात राजू पाटील यांना चंचू प्रवेश देऊ नये असाच सूर शिंदे सेनेत आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेला थेट जागा देण्यास शिंदे सेनेतच विरोध असल्याची चर्चा आहे.