ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा मार्गिकेवर आसनगाव हे नवीन पोलीस ठाणे प्रस्तावित होते. अखेर आजपासून कसारा मार्गिकेवर आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे सुरु होणार आहे. या नव्या पोलीस ठाण्यामुळे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यावरील भार हलका होणार आहे. आसनगाव आणि एलटीटी या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन आज होणार आहे.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त असतानाही प्रवाशांचे मोबाइल, पाकिटे चोरण्याचे प्रकार सुरू आहेत. लोहमार्ग पोलीस ठाण्यांची हद्द मध्य आणि हार्बर मार्गावर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल, कर्जत, कसारा तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते डहाणू रोड पर्यंत आहे. या भागात एकूण १०० हून अधिक रेल्वे स्थानके आहेत. त्यातील केवळ १७ स्थानकांवर पोलीस ठाणे उपलब्ध आहेत. या सर्वच ठिकाणी महिन्याला सरासरी नऊशे ते एक हजार गुन्हे दाखल होत आहेत. त्यापैकी ९० ते ९५ टक्के गुन्हे मोबाइल चोरीचे असतात. तर, उर्वरित गुन्ह्यांमध्ये पाकिट चोरी किंवा इतर प्रकरणांचा सामावेश आहे.

मध्य रेल्वेच्या आसनगाव ते कसारा भागातून लाखो प्रवासी दिवसाला प्रवास करतात. एखादा अपघात झाल्यास किंवा मोबाईल चोरीला गेला तरी येथील प्रवाशांना तक्रार नोंदविण्यासाठी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठावे लागत होते. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यावर कल्याणपासून ते कसारा आणि बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, विठ्ठलवाडी अशा एकूण १४ रेल्वे स्थानकांची हद्द होती. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना गुन्ह्याची उकल करताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशाला शारिरीक आणि मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागते.

पोलीस ठाण्यांवरील हा भार हलका व्हावा यासाठी गृह विभागाने आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि एलटीटी या चार नव्या पोलीस ठाण्याच्या मंजूरीसाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्याला मंजूरी मिळली होती. स्वातंत्र्यदिनानिमित्ताने या पोलीस ठाण्याचा उद्घाटन सोहळा आज पार पडणार आहे. नविन पोलीस ठाण्यांची निर्मिती केंद्रीय रेल्वे व केंद्रीय रेल्वे सुरक्षा बल यांचे मदतीने करण्यात आली असून नवनिर्मित आसनगाव रेल्वे पोलीस ठाणे नवीन वास्तु उदघाटन हे ऑनलाईन पध्दतीने दादर येथे होणार आहे.

काय होत होते?

मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील स्थानकांवर मोठ्या प्रमाणात मोबाइल, पाकीट चोरीच्या घटना घडतात. मात्र, या घटनांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी प्रवाशाला पोलीस ठाणे गाठावे लागते. कसारा रेल्वे स्थानक किंवा त्या भागामध्ये मोबाईल चोरी, मारहाण किंवा इतर कोणती घटना घडल्यास येथील प्रवाशांना कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठावे लागत होते. तक्रार दाखल झाल्यानंतर कल्याण पोलिसांकडून तपास सुरु होतो. परंतु यापूर्वीच्या केसेसचा भार असल्याने गुन्ह्याची उकल केव्हा होईल, हे सांगणे देखील कठीण होत होते.