India Post : ठाणे – देशातील टपाल सेवेमध्ये वेगाने आधुनिकीकरणाची प्रक्रिया आत्मसात करणाऱ्या इंडिया पोस्टच्यावतीने आता लॉजिस्टिक्स क्षमतेत मोठी झेप घेतली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (JNPA) ने नव्याने उद्घाटन झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (NMIA) नजीक सुमारे सहा एकर जमिनीचा तुकडा इंडिया पोस्टला देण्यात आला आहे. या जमिनीवर अत्याधुनिक लॉजिस्टिक्स हब उभारण्यात येणार आहे.

नवी मुंबईतील उलवे येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. जे दक्षिण मुंबईपासून सुमारे ३७ किमी अंतरावर आहे. देशाच्या प्रगतीत तसेच शहराच्या वाढीत विमानतळे ही मुख्य केंद्र ठरत असतात. यामुळे नवी मुंबई परिसरात निवासी प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रे, लॉजिस्टिक पार्क, व्यावसायिक केंद्रे, हॉटेल्स आणि इतर सेवांची उभारणी सुरू झाली आहे. दरम्यान जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी (जेएनपीए) कडून इंडिया पोस्टला सहा एकर जमिनीवर देण्यात आली आहे. यावर इंडिया पोस्टचे लॉजिस्टिक हब उभे राहणार आहे.

लॉजिस्टिक हबमुळे कोणते फायदे होणार

लॉजिस्टिक हब या प्रकल्पाचा उद्देश देशभरातील पार्सल्सचे वितरण अधिक जलद, सुरक्षित आणि कार्यक्षम बनवणे आहे. विशेषतः लघुउद्योग, शिल्पकार, खेळणी निर्माते, मातीचे कारागीर, लोहार आणि बांधकाम कामगार यांना त्यांचे उत्पादन सहजपणे वाहतुकीसाठी उपलब्ध होईल. इंडिया पोस्ट आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक साखळी अधिक सक्षम करणार आहे. विमानतळाच्या अगदी जवळ या हबची उभारणी होत असल्याने, देशभरातील लघुउद्योग, शिल्पकार आणि कारागीर यांना त्यांच्या उत्पादनांच्या जलद वाहतुकीचा मोठा फायदा होणार आहे.

वर्षभरातील इंडिया पोस्टचे काम

गेल्या वर्षभरात इंडिया पोस्टने पार्सल आणि लॉजिस्टिक्स सेवांमध्ये वेगाने बदल घडवून आणले आहेत. संस्थेने ७.८ लाखांहून अधिक जड आणि मोठ्या पार्सल्सचे वितरण यशस्वीरित्या पुर्ण केले आहे. या सेवांचा लाभ देशभरातील खेळणी निर्माते, मातीचे कारागीर, लोहार, शिंपी, बांधकाम कामगार अशा छोट्या उद्योगांना मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येते. याच काळात, २०२५ च्या सुरुवातीला इंडिया पोस्टने शिक्षण मंत्रालय आणि एडसीआयएल यांच्या सहकार्याने देशातील शाळांमध्ये वितरित होणाऱ्या ९ लाख ‘फुटबॉल फॉर स्कूल्स’ प्रकल्पातील चेंडूंच्या पार्सलची जबाबदारी पार पाडली. या प्रकल्पाद्वारे फिफा आणि भारत सरकारने मुलांमध्ये खेळाची आवड वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, अमेरिकेकडून ड्युटी-फ्री आयात नियमांमधील बदलामुळे काही काळ व्यापारावर परिणाम झाला होता. मात्र, इंडिया पोस्टने स्पष्ट केले आहे की आता सर्व पार्सल्सचे वहन पूर्णपणे पुन्हा सुरू झाले आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी इंडिया पोस्टने ३० टक्के व्यवसायवाढीचे लक्ष्य ठेवले आहे. तर वास्तववादी अंदाजानुसार १८ ते २० टक्के वाढ साध्य होण्याची अपेक्षा आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ उभारण्यात येणारा हा नवीन लॉजिस्टिक्स हब केवळ इंडिया पोस्टसाठी नव्हे, तर देशाच्या निर्यात व लघुउद्योग क्षेत्रासाठीही एक नवा टप्पा ठरेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.