ठाणे : कर्करोगावरील उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी नवी मुंबईतील टाटा मेमोरियलच्या प्रगत केंद्रात नवीन कॅन्सर केअर इमारतीचे बांधकाम सुरू करण्याची घोषणा आयसीआयसीआय बँक आणि टाटा मेमोरियल सेंटरने केली आहे. बँकेच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ६२५ कोटी रुपयांच्या योगदानाच्या साहाय्याने हे केंद्र भारतातील सर्वात मोठ्या रेडिएशन थेरपी केंद्रांपैकी एक असणार आहे, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमीपूजन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा, कार्यकारी संचालक संदीप बत्रा, कार्यकारी संचालक अजय गुप्ता आणि टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता हे यावेळी उपस्थित होते.

तळमजला तसेच दोन बेसमेंट असलेली ११ मजली इमारत ३.४ लाख चौरस फुटांवर बांधली जाणार आहे. यामध्ये १२ अत्याधुनिक लिनियर एक्सीलरेटर्स आणि कर्करोगाशी संबंधित इतर प्रगत उपकरणे असणार आहेत. ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ दरवर्षी ७ हजार २०० रुग्णांना रेडिएशन थेरपीची सोय उपलब्ध करून देणार आहेत.

या अंतर्गत रुग्णांची दोन लाखांहून अधिक रेडिएशन सत्रांची सोय केली जाणार आहे. या व्यतिरिक्त, वर्षभरात २५ हजार नवीन रुग्णांना ओपीडी सल्ला तसेच निदान करण्यास मदत करेल. हे केंद्र २०२७ पर्यंत पूर्ण होणार असल्याची चिन्हे आहेत. आयसीआयसीआय बँकेची सीएसआर शाखा, आयसीआयसीआय फाऊंडेशन फॉर इन्क्लुजिव्ह ग्रोथ, या केंद्राचे बांधकाम आणि एकूणच कामकाजावर देखरेख ठेवणार आहे.

या भूमीपूजन सोहळ्या प्रसंगी आयसीआयसीआय बँकेचे अध्यक्ष प्रदीप कुमार सिन्हा म्हणाले, “आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथ या आपल्या सीएसआर शाखेद्वारे आयसीआयसीआय बँक आरोग्यसेवा, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका आणि सामुदायिक विकास प्रकल्प या चार संकल्पनांवर काम करत आहे.

देशातील महत्त्वाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या आमच्या प्रयत्न आहे. कर्करोग काळजी मोहिमेत टीएमसीसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. हे केंद्र पूर्ण झाल्यानंतर आणि संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर ‘आयसीआयसीआय फाउंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’ रेडिएशन थेरपीसाठी भारतातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असणार आहे.”

आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक संदीप बत्रा म्हणाले, “देशातील कर्करोगासाठी आवश्यक आरोग्यसेवा पायाभूत सुविधांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. विशाखापट्टणम, नवी मुंबई आणि मुल्लानपूर येथे तीन नवीन कँसर केअर रुग्णालये स्थापन करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरला १,८०० कोटी रुपये देण्याचे आमचे आश्वासन आहे. तर, नवी मुंबईतील ही नवीन इमारत अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज असेल.”

नवी मुंबई, नवीन चंदीगड आणि विशाखापट्टणम येथे तीन नवीन ब्लॉक्स स्थापन करण्यासाठी आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुझिव्ह ग्रोथने दिलेल्या भक्कम पाठबळासाठी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी मनापासून आभार व्यक्त केले. ते म्हणाले,“या सुविधांमुळे वंचित रुग्णांना अत्याधुनिक सुविधा, पुरावा आधारित उपचार पद्धतीमुळे उपचारांना प्रतिसाद लगेच कळेल आणि येणाऱ्या वर्षांसाठी आमची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल. हे ब्लॉक लहान मुलांना तसेच प्रौढांना होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगासाठी उत्कृष्टत केंद्र स्थापन करतील.”

आयसीआयसीआय फाऊंडेशन ब्लॉक फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजीमध्ये या सुविधा उपलब्ध

अचूक थेरपीसाठी प्रगत रेडिएशन उपकरणे.

बाहेरील तसेच रुग्णालयातील रुग्णांसाठी एमआरआय, सीटी स्कॅनर, सीटी सिम्युलेटर सारख्या रेडिओलॉजी सुविधा.

वैद्यकीय व्यावसायिकांसाठी संशोधन आणि प्रशिक्षण सुविधा.