ठाणे : करोना काळापासून जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेचा यंदाच्यावर्षीचा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिनाअखेरीस सादर होण्याची चिन्हे आहेत. अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात झाली असून या बैठकांनंतर अर्थसंकल्प अंतिम करून तो सादर केला जाणार आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प सादर होणार असल्याने कर दर वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे पालिका सुत्रांकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची राज्यभरातून गर्दी

करोना काळात ठाणे महापालिकेचा मालमत्ता कर विभाग वगळता इतर विभागांच्या उत्पन्न वसुलीत मोठी घट झाली. या काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबच रुग्ण ‌उपचार करण्यावर पालिकेचा मोठा निधी खर्च झाला. जमा-खर्चाचे गणित बिघडले असतानाच, पालिकेवर सुमारे चार कोटींचे दायित्व निर्माण झाले. यामु‌ळे पालिका आर्थिक संकटात सापडली असून ही परिस्थिती आजही कायम आहे. अशा परिस्थितीत गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी एकूण ३ हजार २९९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. पालिका निवडणुकांच्या तोंडावर सादर झालेल्या या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ प्रस्तावित करण्यात आलेली नव्हती. महिनाभरातच पालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टत येऊन प्रशासकीय राजवट लागू झाली. वर्षभराचा काळ लोटत आला तरी पालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसून या निवडणुका येत्या काही महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या निवडणुकांच्या तोंडावर पालिकेचा २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

हेही वाचा >>> कल्याण: टिटवाळ्यातील ‘केडीएमटी’चे बस स्थानक अडगळीत,मालमत्ता विभागातील लालफितीचा फटका

ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करासह इतर विभागांची अपेक्षित कर वसुली होत असली तरी चार हजार कोंटीचे दायित्व कमी करण्यावर ही रक्कम खर्च होत आहे. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या वस्तु आणि सेवा करातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात आहे. यामुळे पालिकेचा आर्थिक गाडा अद्याप रुळावर आलेला नसल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी पालिकेला दिला असून त्यातून सुशोभिकरण, रस्ते नुतनीकरण तसेच विविध कामे सुरु आहेत. या निधीमुळे पालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाला असला तरी पालिकेच्या तिजोरीत मात्र स्वत:चा फारसा निधी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत पालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार असून त्यात नव्या प्रकल्पांची घोषणा होणार की, जुन्याच प्रकल्पांच्या पुर्णत्वावर भर देणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होणार आहे.

अधिकाऱ्यांच्या बैठका

ठाणे महापालिकेच्या वित्त व लेखा विभागामार्फत अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. या विभागाकडे दरवर्षी पालिकेचे विविध विभाग नव्या प्रकल्पांच्या प्रस्तावांसह विविध कामांसाठी निधी राखीव ठेवण्याच्या मागणीचे पत्र देतात. विविध विभागांकडून निधीची करण्यात आलेली मागणी आणि पालिकेला वर्षभरात अंदाजित किती उत्पन्न मिळू शकते, याचा अंदाज बांधत वित्त व लेखा विभागाकडून अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. महापालिका आयुक्तांकडून अर्थसंकल्प अंतिम करून तो सादर केला जातो. अशाचप्रकारे या विभागाकडून यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरु असून त्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत. कच्च्या स्वरुपात तयार केलेल्या अर्थसंकल्प अंतिम करण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर हे लवकरच सर्वच विभागप्रमुखांसोबत बैठका घेणार असून त्यानंतर तो अंतिम करून सादर करणार आहेत, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indication of thane municipal budget likely to present at the end of month zws
First published on: 09-02-2023 at 17:15 IST