डोंंबिवली – कल्याण आणि डोंबिवली हद्दीवरील कचोरे पत्रीपूल भागात अधिक प्रमाणात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांना आहे. या भागात गांजा सेवन करण्यास मिळतो म्हणून कल्याण, डोंबिवली शहर परिसरातील अनेक गांजा सेवन करणारे व्यसनी या भागात तळ ठोकून असतात. अशा गांजा सेवन करणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील एकूण सात जणांवर टिळकनगर पोलिसांनी अंमली पदार्थ प्रतिबंध कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.
कल्याण, डोंंबिवली शहर नशामुक्त करण्यासाठी कारवाईचा भाग म्हणून पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली शहर परिसरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि गांजा सेवन करणे, उघड्यावर मद्य सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एक गस्ती पथक तयार केले आहे. रात्रीच्या वेळेत पत्रीपूल, बैलबाजार, कचोरे, नेतिवली टेकडी भागात गांजा विकत मिळतो म्हणून डोंबिवली, कल्याण शहर भागातील अनेक तरूण, नागरिक गांजा मिळेल या आशेने पत्रीपूल, कचोरे टेकडी भागात फिरत असतात.
हे ठिकाण गांजा विक्री करणाऱ्या तस्करांना पळण्यासाठी सोयीस्कर आहे. या भागात झोपडपट्ट्या आणि डोंगर भाग आहे. त्यामुळे तस्करी केल्यानंंतर पळून जाण्यासाठी हा आडमार्ग आहे. पत्रीपूल भागात गांंजा तस्करांची येजा वाढल्याची आणि या भागात गांजा सेवन करण्यास मिळतो म्हणून विविध भागातील नागरिक, तरूण गांजा सेवन करण्यासाठी, खरेदीसाठी येत असल्याची माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी त्यामुळे या भागातील गस्त वाढवली आहे.
गेल्या आठवड्यात पोलिसांनी दररोज संध्याकाळी ते रात्री उशिरापर्यंत पत्रीपूल, कचोरे टेकडी भागात गस्त घालून गांजा सेवन करणाऱ्या एकूण सात जणांना पकडले आहे. हे ताब्यात घेतलेले तरूण २१ ते २४ वयोगटातील आहेत. समीर सोनार, रोशन विश्वकर्मा, अर्जुन चौहाण, किशन चौहाण, शंकर हाथी, गौतम चव्हाण, सागर चौहाण आणि अन्य एक अशी गांंजा सेवन करताना पकडलेल्यांची नावे आहेत. ते पत्रीपूल ते कचोरे भागात इमारती, झाडाझुडपांचा आडोसा घेऊन गांजा सेवन करत होते. या सातही जणांवर टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या निर्देशावरून स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या सातही जणांनी कोणाकडून गांजा खरेदी केला. ते ठिकाण कोणते आणि त्या गांजा तस्कराचे नाव काय होते, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.