कल्याण : डोंबिवली एमआयडीसीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (घरडा सर्कल) कल्याण डोंबिवली पालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे मुलुंडच्या कालिदास नाट्यगृहाच्या धर्तीवर नुतनीकरण, पुनर्विकास आणि सुशोभिकरण करण्याच्या हालाचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत. या कामासाठी शासनाने १५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या दोन दिवसात या कामाची निविदा प्रक्रिया अंतीम करून, येत्या तीन महिन्याच्या कालावधीत सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे रंगरूप बदलून नाट्यगृह सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

गेल्या मे मध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील प्रेक्षा गृहातील छताचा काही भाग कोसळला. या कोसळलेल्या भागाची तात्पुरती डागडुजी केली. आणि पुन्हा पावसाळ्यात नाट्यप्रयोग किंवा इतर काही कार्यक्रम सुरू असताना पुन्हा काही दुर्घटना घडली तर प्रेक्षकांसह नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा विचार पालिका प्रशासनाकडून करण्यात आला.

सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या छत कोसळलेल्या भागातील डागड़ुजी पुरता विचार न करता नाट्यगृहाचे संपूर्ण नुतनीकरण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. या नुतनीकरण कामासाठी शासनाकडे पालिकेने निधीची मागणी केली होती. शासनाने १५ कोटीचा निधी या कामासाठी उपलब्ध करून दिला आहे. खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे या नाट्यगृहाच्या संपुूर्ण पुनर्विकासासाठी इच्छुक होते. गेल्या पाच महिन्यापासून सावित्रीबाई फुले नाट्यगृह बंद असल्याने डोंबिवली शहर परिसरातील नाट्य, सांगीतिक रसिकांचा हिरमोड झाला आहे. पालिकेने लवकरात लवकर नाट्यगृहाची देखभाल, डागडुजी, नुतनीकरण करून नाट्यगृह सुरू करावे, अशी डोंबिवलीतील नाट्य रसिकांची मागणी आहे.

सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पायभरणी ते नाट्यगृह सुरू होण्याच्या कामासाठी सुमारे १९९५ ते २००६ असा अकरा वर्षाचा काळ लोटला. नाट्यगृह हे साहित्यिक, नाट्य रसिक डोंबिवलीतील नागरिकांच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्यामुळे निधीची अडचण असली तरी नाट्यगृह पूर्ण झालेच पाहिजे यासाठी ज्येष्ठ वास्तुविशारद आणि सल्लागार राजीव तायशेटे, पालिका निवृत्त साहाय्यक अभियंता महेश गुप्ते आणि डोंबिवलीतील नाट्य रसिकांनी यांनी विशेष मेहनत घेतली.

सावित्रीबाई नाट्यगृह सुरू होऊन सुमारे वीस वर्षाचा काळ लोटला आहे. त्यामुळे या नाट्यगृहाचे पूर्ण नुतनीकरण होणे आवश्यक असल्याने पालिकेच्या बांधकाम विभागाने आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सावित्रीबाई फुले नाट्यगृह नुतनीकरण, सौंदर्यीकरण आणि देखभाल, दुरूस्तीच्या कामाचे नियोजन केले आहे. या कामाची निविदा येत्या दोन ते तीन दिवसात अंतीम केली जाईल. निविदा प्रक्रियेनंतर कामाचे आदेश देऊन हे काम मजबुतीने येत्या तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे शहर अभियंता अनिता परदेशी यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले नाट्यगृह उभारून वीस वर्षाहूनचा अधिक काळ लोटला आहे. या नाट्यगृहाच्या नुतनीकरण, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी शासनाने पंधरा कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येत्या तीन महिन्यात ही कामे पूर्ण करून नाट्यगृह रसिकांसाठी खुले केले जाईल. अनिता परदेशी शहर अभियंता.