तीव्र पाणी टंचाईच्या काळात जिथे पिण्याचे पाणी मिळायला मारामार तिथे कपडे धुण्यासाठी कुठून पाणी आणणार? कल्याण, डोंबिवलीकरांनी यातून मार्ग काढला असून आठवडाभरातील कपडे गोळा करून मुंबईतील नातेवाईकांकडून धुऊन आणायला सुरुवात केली आहे.
ठाणे जिल्ह्य़ात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले असताना मुंबईत मात्र पाणीपुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना मुंबईतील नातेवाईकांकडून कपडे धुऊन आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काही नोकरदार महिला सध्या रविवारीही लोकल पकडून मुंबईला जात आहेत. पुरेसे पाणी नसल्याने आमच्यापुढे अन्य कोणताही पर्याय नसल्याचे त्यापैकी एका महिलेने सांगितले.
हॉटेलमध्ये अर्धा ग्लास
भर दुपारी उन्हातून चालताना अंगाची अगदीच लाहीलाही होते. खूप तहान लागल्यावर आपली पावले आपसूकच हॉटेलमध्ये वळतात. तेथे वाटसरूंसाठी पिण्याचे पाण्याचे ग्लास भरून ठेवलेले असतात. मात्र सध्या अनेक हॉटेल्समध्ये ग्लास अर्धवट भरून ठेवलेले असतात. ‘आधी तेवढे पाणी प्या, आणखी हवे असेल तर मागून घ्या’ असे वेटर सांगतात. अनेकदा ग्राहक अर्धाच ग्लास पाणी पितात, मग उरलेले पाणी फेकून द्यावे लागते. दिवसभर अशा शंभरेक ग्राहकांना जरी अर्धा ग्लास पाणी टाकले तरी पन्नासेक ग्लास पाणी वाया जाते. ते वाचवावे म्हणून आधी अर्धा ग्लास पाणी देण्याचे धोरण अवलंबले असल्याची माहिती हॉटेल व्यवस्थापकाने दिली. अनेकांनी हॉटेल्समधील मोठे ग्लास बाद ठरवून लहान ग्लास ठेवले आहेत. त्यामुळेही पाण्याची बचत होते. या लहानशा उपायांमुळे पूर्वीपेक्षा २० ते २५ टक्के पाण्याची बचत झाल्याची माहिती ‘रंगोली’ हॉटेलचे मालक जयदीश शेट्टी यांनी दिली. रुची सम्राट हॉटेलचे मालक म्हणाले, आम्ही तर रिकामे ग्लास आणि एक मग टेबलावर ठेवतो. ग्राहक त्यांना हवे तेवढे पाणी घेऊन पितात. ग्राहकांबरोबरच आता हॉटेल व्यावसायिकांमध्येही जनजागृती झाली असून प्रत्येकजण आपआपल्या पातळीवर काही ना काही उपाययोजना करून पाण्याची बचत करत असल्याचेही त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. सामान्य नागरिकांनाही त्याची जाणीव होऊ लागली आहे. ग्लासात उरलेली पाणी सहज आजूबाजूला दिसणारे एखादे रोप पाहून त्याला घातले जाऊ लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th May 2016 रोजी प्रकाशित
कपडे धुण्यासाठी मुंबईच्या नातेवाईकांचा आधार
ठाणे जिल्ह्य़ात पाणी समस्येने उग्र रूप धारण केले असताना मुंबईत मात्र पाणीपुरवठा सुरळीत आहे
Written by शर्मिला वाळुंज

First published on: 07-05-2016 at 02:56 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan dombivali resident washing clothes by their relatives in mumbai